Team India Victory Parade : भारतीय क्रिकेट संघानं टी20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर अखेर संघ मायदेशी परतला. पंतप्रधनांची भेट घेतल्यानंतर संघानं दिल्लीहून मुंबई गाठली आणि इथं आयोजित करण्यात आलेल्या व्हिक्ट्री परे़डसाठी मुंबईकरांसह क्रिकेटप्रेमींनी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. (Mumbai Marine Drive News)
भर दुपारपासूनच अनेकांनी मरिन ड्राईव्हची वाट धरत रोड शो पाहण्यासाठी आपली जागा निश्चित केली. कोणी डिव्हायडरवर तर कोणु फुटपाथवर जागा मिळेल तिथं उभं राहिलं. संघ तिथे पोहोचण्यास काहीसा विलंब झाला. पण, आनंद आणि उत्साहापुढं हा विलंबही फिका होता. अखेर संघाच्या खेळाडूंना घेऊन एक खुली बस क्विन्स नेकलेसहून वानखेडेच्या दिशेनं निघाली आणि एकच आवाज झाला. चाहत्यांनी खेळाडूंच्या नावानं जयघोष केल्याचं पाहायला मिळालं. ही दृश्य भारावणारी होती. पण, या नाण्यालाही दोन बाजू असल्याचं व्हिक्र्टी परेडनंतर पाहायला मिळालं.
मुंबईतील मरिन ड्राईव्हवर खेळाडूंच्या स्वागतासाठी आलेल्यांनी तोबा गर्दी केली आणि याच गर्दीमध्ये जवळपास 10 जण जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. या रुग्णांवर जीटी रुग्णालयात उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. स्वागतासाठीच्या रॅलीवेळी गर्दी अटोक्याबाहेर गेल्यानं वाढल्याने गर्दीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला.
#WATCH | Maharashtra: "...The crowd started increasing and there was no protection from the police. Nothing was streamlined. As the team arrived people started shouting and those standing ahead of me fell...," says Ravi Solanki, a cricket fan present at Marine Drive during the… https://t.co/ZDWk0LZ8Ng pic.twitter.com/7Ynl1fdQz9
— ANI (@ANI) July 4, 2024
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार रेटारेटी, चेंगराचेंगरी झाल्याने अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं, काहींना श्वसनास त्रास जाणवला. त्यामुळे अनेक चाहत्यांची प्रकृती बिघडल्याने नजीकच्या जीटी आणि इतर काही रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार सध्या 10 जण रुग्णालयात दाखल असल्याचं म्हटलं जात आहे.
मिरवणुकीदरम्यान या चाहत्यांच्या चपलाही तुटल्या. सध्या या भागातील रस्त्यांवर चपलांचा खच पडला आहे. इथं इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती की काही प्रत्यक्षदर्शींच्या मते पोलीस बलही अपुरं पडताना दिसलं. सुव्यवस्थेचा अभाव जाणवल्याची प्रतिक्रियाही इथं आलेल्या काही क्रिकेटप्रेमींनी दिली.