Uday Samant On Sanjay Raut: उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनीदेखील केला होता. त्यानंतर राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सगळ्या चर्चां धादांत खोट्या असल्याचं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. 'शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलिकडचे आहेत', असं उदया सामंत यांनी म्हटलं आहे.
'संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य मी ऐकलं आहे. हा राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यात मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचे दोनदा उद्योगमंत्रीपद मिळालं याची मला पूर्णपणे जाणीव आहे. अशा सर्वसामान्य नेत्याने माझ्या राजकीय जीवनासाठी मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत. ते मी कधीच विसरु शकत नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळं कोणीही आमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही,' असं देखील सामंत यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही सामंत यांनी उत्तर दिलं आहे. 'एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार आणि मी आपण सर्व सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहोत. त्याच्यामुळं दोन सर्वसाधारण कुटुंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला नेण्याचं षडयतंत्र तुम्ही करु नका. तुम्हीदेखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कितीवेळा भेटलात याची मला माहिती आहे. पण मी काही राजकीय शिष्टाचार पाळतो आणि म्हणून मी कधीच वैयक्तीक बदनामीकारक टिका करत नाही. सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी षडयंत्र करु नका, असं देखील सामंतांनी म्हटलं आहे. राऊतांनी केलेले वक्तव्य धादांत खोटं आहे,' असं म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. भाजपला राज्यात एकहाती सत्ता पाहिजे. त्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून होत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवारांनी भाजपवर केलाय. त्यासाठी एक 'उदय' पुढे आणण्याचेदेखील प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.