स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : मुंबईनजीक असलेल्या घारापुरी बेटावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घारापुरी येथे असलेल्या शिवलेणी आणि त्रिमूर्तीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. मात्र यावेळी मोठी दुर्घटना घडली असती. भक्तांना घेऊन गेलेल्या तीन बोट गाळात रुतल्याने प्रवासी भयभीत झाले होते. यामध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक प्रवासी हे उरणनजीकच्या मोरा बंदरातील गाळात बोट रुतल्याने अडकून पडले होते.
महाशिवरात्रीनिमित्ताने शुक्रवारी त्रिमूर्ती आणि शिव अवताराच्या दर्शनासाठी घारापुरी लेणीवर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी शिवभक्तांच्या सुरक्षितता आणि जाण्या-येण्याची व्यवस्था पोलीस, बंदर, महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायत, नागरी सुरक्षा दल आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी सोय केली होती. घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटींची सोय करण्यात आली होती. मात्र यावेळी मोठी दुर्घटना टळली आहे.
घारापुरी बेटावर असलेल्या ऐतिहासिक शिवलेणी आणि शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावत असतात. यामध्ये मुंबई, उरण, न्हावा आणि नवीमुंबई येथून अनेक भाविक हे महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी येथे जात असतात. यासाठी, उरण आणि मुंबई येथून विशेष बोटींची व्यवस्था करण्यात येत असून दिवसभर प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे माजी सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगीतले आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घारापुरी येथून परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांना बोट गाळात रुतल्याने अडकून रहावे लागले होते. यावेळी, मोरा बंदरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर तीन बोटी अडकल्याने सुमारे 500 पेक्षा अधिक प्रवासी हे समुद्रातच अडकल्याने काहीसे भयभित झाले होते. तर, सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर या बोटी मोरा बंदरात आणण्यात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.