मुंबई : सूर्यनारायण सध्या चांगलाच तापू लागला आहे. यंदा मार्च महिन्यातच उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. राज्याच्या बहुतांश भागात पाऱ्यानं चाळिशी पार केलीय. वाढत्या उष्णतेची मोठी झळ लोकांना सोसावी लागतीय.
उनापासून थोडासा गारवा मिळवण्यासाठी आपली पावलं आपोआप थंडपेयाच्या गाडीकडे वळतात. थंडगार उसाचा रस, फळांचा रस, लस्सी, ताक पिण्यासाठी आपण गाडीकडे थांबतो. पण उन्हाळ्यात तुमचा रस्त्यावरचं एखादं थंड सरबत पिण्याचा विचार असेल किंवा गोळा खाण्याचा विचार असेल, तर सावधान.
कारण शहरात विविध ठिकाणी फेरीवाल्यांकडील बर्फ दूषित असल्याचं समोर आलं आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत चक्क विषाणू आढळून आले आहेत.
मुंबईत अस्वच्छ पाण्यापासून तयार झालेल्या बर्फावर कारवाई करण्यात आलीय. महापालिका यासंदर्भात सध्या धडक कारवाई करतेय. हातोड्यानं असा बर्फ तोडून नष्ट केला जातोय. धक्कादायक म्हणजे कारवाई केलेल्या बर्फामधल्या ७५ टक्के बर्फामध्ये ई कोलाय विषाणू सापडलाय.
या विषाणूमुळे कावीळ, जुलाब असे रोग होण्याची शक्यता आहे. अस्वच्छ पाण्यापासून तयार झालेल्या बर्फाचं सरबत किंवा गोळा खाल्लात तर थेट डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ शकते.