Mumbai Rain: पाऊस तारणार आणि पाऊसच संकटातही लोटणार? मुंबईवर घोंगावतंय कोणतं सावट?

Mumbai Rain Update : मान्सूनच आगमन झाल्यानंतर त्याने काही दिवस ब्रेक घेतला. पण पुन्हा एकदा पावसाने दमदार एन्ट्री केली खरी तरीदेखील मुंबईकरांवर संकट कायम आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 21, 2024, 10:16 AM IST
Mumbai Rain: पाऊस तारणार आणि पाऊसच संकटातही लोटणार? मुंबईवर घोंगावतंय कोणतं सावट? title=

Mumbai Monsoon Updates : राज्यासह देशातही मान्सूनने वेळेत आगमन केलंय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी योग्य वातावरण आहे. काहीशा विश्रांतीनंतर मान्सूने पुन्हा एकदा जोर धरला आहे. हवामान विभागाने काही विभागात दमदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. (Mumbai Rain Update heavy rains awaited in dam areas Monsoon Updates)

मुंबईवर घोंगावतंय कोणतं सावट?

अशा स्थितीत मुंबईकरांवर एक वेगळंच संकट घोंगावतंय. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने अद्याप एन्ट्री केलेली नाही. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. 

मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू झाली आहे. तर मुंबई महानगरपालिका हद्दीतील ठाणे, भिंवडी - निदामपूर महानगरपालिका आणि आसपासच्या गावांमध्येही पाणीकपात लागू आहे. त्यात सध्या 7 धरणांमधील पाणीसाठी हा 5.32 टक्के इतकाच आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत या 7 धरण क्षेत्रात केवळ 162 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

कोणत्या धरणात किती पाणी साठा?

गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी
उर्ध्व वैतरणा - 10 मिमी
मोडकसागर - 23 मिमी
तानसा - 38 मिमी
मध्य वैतरणा - 18 मिमी
भातसा - 10 मिमी
विहार - 15 मिमी
तुळशी - 49 मिमी 

सातही धरणांची मूळ पाणी साठवण क्षमता 14 लाख 47 हजार 363 असून आता धरणांत केवळ 77 हजार 052 दशलक्ष लिटर इतकंच पाणी शिल्लक आहे. मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असली तरीही धरण क्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यातच सातत्याने खालावत चाललेल्या धरणातील पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झालीय. राज्या सरकारच्या परवानगीनुसार आता भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठ्याने मुंबईकरांची तहान भागवली जातेय.