Mumbai News : सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक फोटो कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही फोटो इतके बोलके असतात की पाहणाऱ्यांनाही त्याबाबत चर्चा केल्यावाचून शांत राहताच येत नाही. सध्या असेच काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमधील मजकूर पाहता विवाहोत्सुक महिलेनं तिचा होणारा पती कसा असावा यासाठी मांडलेल्या अपेक्षा इथं पाहायला मिळत आहेत. आता या अपेक्षा आहेत की आणखी काही...? असाच प्रश्न ही यादी पाहताना अनेकांच्या मनात घर करत आहे.
वय वर्ष 37, मुंबईतच वास्तव्यास असणाऱ्या या महिलेनं तिच्या भावी पतीसाठी काही अपेक्षा केल्यानं आता अरेंज मॅरेज पद्धतीनं लग्न करणाऱ्यांना नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या अपेक्षांना सामोरं जावं लागतं याचाच प्रत्यय येत आहे. मुळात होणाऱ्या जोडीदाराकडून काही ठराविक अपेक्षा ठेवण्यात गैर काहीच नाही. पण, या अपेक्षांनाही कुठंतरी मर्यादा असावी ही बाब हल्लीच्या वास्तववादी जगण्यात आपण विसरतच चाललो आहोत हेसुद्धा तितकंच खरं.
एका X अकाऊंटवरून या 37 वर्षीय महिलेच्या नवरदेवाकडून असणाऱ्या अपेक्षांची यादी सर्वांसमोर आली आहे. या यादीनुसार एका वर्षात 4 लाख रुपये इतकी कमाई असणाऱ्या या महिलेच्या अपेक्षा आहेत....
Expectation of groom by a 37 year old female earning 4,00,000 per year, translated from Marathi. This is next level delusion. pic.twitter.com/0ohyDboqpd
— Ambar (@Ambar_SIFF_MRA) April 2, 2024
मुलाचा पगार, संपत्ती आणि आर्थिक सुबत्ता याबाबतच्या अपेक्षांसह तो स्थिरस्थावर हवा अशा मागण्या या महिलेनं समोर ठेवल्या आहेत. तिच्या अपेक्षांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होताच काहींनी या अपेक्षांची प्रशंसा करत सध्याच्या काळात पगाराची अट वगळता इतर अपेक्षांमध्ये गैर काय असा सवाल केला. तर, काहींनी वयाच्या 37 व्या वर्षी या महिलेनं इतक्या अपेक्षा ठेवणं म्हणजेच नात्याची सुरुवातच अपेक्षाभंगानं करण्याची सूचक प्रतिक्रियाही दिली. काहींनी या अपेक्षांच्या यादीवर कोपरखळीही मारल्याचं पाहायला मिळालं. जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षांमध्ये गैर काहीच नसतं. पण, काही अपेक्षा फारच अनाकलनीय असतात, यावर तुमचं काय मत?