मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेत

 मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता (Mumbai Property Tax) करमाफीचा निर्णय हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.  

Updated: Dec 3, 2020, 03:10 PM IST
मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेत   title=

कृष्णात पाटील / मुंबई : मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफीचा (Mumbai Property Tax) निर्णय हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी संपूर्ण मालमत्ता करमाफी दिल्यानंतर यंदा मात्र मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने यू टर्न घेतला आहे. यंदा मालमत्ता कराअंतर्गत ( Property Tax) येणाऱ्या १० करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार असून इतर ९ कर मात्र भरावे लागणार आहेत.

२०२०-२१ या वर्षाच्या मालमत्ता कराची बिले ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही पाठवण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणूक वचननाम्यात शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीची घोषणा केली होती. २०१९ च्या शासन निर्णयात मालमत्ता करामधील केवळ सर्वसाधारण कर रद्द करण्याचाच उल्लेख केला आहे. याची अंमलबजावणी २०१९ मध्ये सुरू झाल्यानंतर विरोधकांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं मालमत्ता करांतर्गत येणा-या इतर ९ करांची बिले प्रशासनाला सांगून पाठवली नव्हती

मागील वर्षी संपूर्ण मालमत्ता करमाफी दिल्याने पालिकेला २८५ कोटी रूपयांचा फटका बसला होता. त्यामुळं यंदा ही बिले पाठवली जाणार आहोत. मालमत्ता कराअंतर्गत नागरिकांना सर्वसाधारण कर, पाणीपट्टी कर, जललाभ कर, मलनिस्सारण कर, मलनिस्सारण लाभ कर, राज्य शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, वृक्ष उपकर, पथकर हे दहा कर भरावे लागतात. त्यामधील सर्वसाधारण कर माफ केला आहे. इतर ९ कर मात्र नागरिकांना भरावे लागणार आहेत. 

मालमत्ता कराअंतर्गत सर्वसाधारण कराचे प्रमाण हे १० ते ३० टक्के दरम्यान असते, जे माफ केले जाणार आहेत. मात्र, इतर करांचा वाटा असलेली ७० ते ९० टक्के रक्कम भरावी लागेल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.