Mumbai Mega Block : मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबई लोकल ट्रेन सेवेचे वेळापत्रक रविवारी काही काळ प्रभावित होणार आहे. विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील (Harbor lines) विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या मार्गावरुन प्रवास करताना वेळापत्रक पाहूनच पर्याय निवडावा.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या / येणाऱ्या डाऊन आणि अप मेल, एक्स्प्रेस, ठाणे ते विद्याविहारदरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळेत सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वाशी, बेलापूर, पनवेल येथून सीएसएमटी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पर्यायी व्यवस्था
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी, नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. तर नेरुळ ते बेलापूर ते खारकोपर मार्गावरही ब्लॉक नसणार आहे.
NO DAY BLOCK OVER WR ON SUNDAY, 9th JULY 2023
WR to undertake a block of 5 hrs frm 23.30 to 04.30 hrs during intervening night of 8th/9th July, 2023 on DOWN slow line btwn Mahim & Santacruz stns for maintenance of track, signalling & overhead equipment,etc@RailMinIndia @drmbct pic.twitter.com/UlkDQkZ7Uy
— Western Railway (@WesternRly) July 7, 2023
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते सांताक्रूझ डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या रात्रकालीन ब्लॉकमध्ये मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकांना फास्ट लोकलचे फलाट नसल्याने तिथे या लोकल थांबणार नाही. तर, लोअर परळ, माहीम आणि खार रोड येथे फलाटांची रुंदी कमी असल्याने दोनदा लोकल थांबा असणार आहे. तसेच डाऊन दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.