Mumbai Local: रेल्वे मार्गावरुन दररोज 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना लोकलमधून पडून शेकडो प्रवाशांचे मृत्यू होतात. हे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने एसी लोकल (AC Local ) सेवेत आणल्या. डिसेंबर 2017 मध्ये पहिली एसी लोकल सेवेत दाखल झाल्यानंतर आता हळूहळू एसी लोकच्या संख्येत वाढ होत गेली. याचपार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रेल्वे मंत्रालयाने 238 एसी (AC) रेक खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 20,000 कोटी रुपये आहे. एकंदरीत येत्या काही वर्षात मुंबईकरांचा (Mumbai AC Local) प्रवास गारेगार होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एसी रेकच्या खरेदीला हिरवा झेंडा दाखवला आहे. या बैठकीत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) टप्पा 3 आणि 3A च्या स्थितीवरही चर्चा झाली. या योजनेचा एक भाग म्हणून, एसी लोकल गाड्यांच्या देखभालीसाठी भिवपुरी आणि वाणगाव येथे नवीन कारशेड उभारण्यात येणार आहे. मात्र या एसी गाड्यांच्या खरेदीसाठी मंत्री कार्यालय आणि रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. हे विशेष. मंजुरीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी, आवश्यक मंजुरी जलद-ट्रॅक करण्यासाठी रेल्वे बोर्डाला विनंती करण्यात आली आहे.
खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी जूनमध्ये जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. या निविदा एसी रेकच्या विकास, उत्पादन आणि देखभालीसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. खरेदी योजनेनुसार, MUTP-3 मध्ये 3,491 कोटी रुपये खर्चाचे 47 AC रॅक असतील आणि MUTP फेज 3A मध्ये 15,802 कोटी रुपये खर्चाचे 191 AC रेक असतील.
दरम्यान अलिकडेच MUTP-3A प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय, महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय 2022-2023 या आर्थिक वर्षात MUTP कामांसाठी सक्रियपणे निधीचे योगदान देत आहेत.
मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) हा महाराष्ट्र सरकार आणि भारतीय रेल्वे यांच्यातील 50:50 चा संयुक्त उपक्रम आहे. MUTP-3 आणि 3A च्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमआरव्हीसीला 44,600 कोटींहून अधिक निधी मिळणार आहे.
दरम्यान नवीन एसी रेक व्हेस्टिब्युल कॉन्फिगरेशन आणि सहाव्या कोचच्या शेवटी मशीनरी प्लेसमेंटसह डिझाइन केले जातील. या गाड्या स्वयंचलित स्मोक अलार्म आणि फायर डिटेक्शन सिस्टमने सुसज्ज असतील. याशिवाय, मोटरमन/गार्डसाठी सोयीस्कर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे ठिकाण दिले जातील.
भविष्यात सर्व साध्या लोकल या एसी लोकलमध्ये रूपांतर केल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट दराचा प्रश्न भेडसावणार आहे. जर भविष्यात प्रवाशांना तिकीट भाडे कमी झाल्यास एसी लोकलला प्रतिसाद मिळणार का? त्यामुळे येणाऱ्या उपनगरीय एसी लोकल गाड्यांची संख्या वाढल्यास एसी लोकल गाड्यांचे तिकीट दर कमी होण्याची शक्यता आहे.
एकूण 238 एसी लोकल गाड्या
MUTTP-3 अंतर्गत 47
MUTTP-3A अंतर्गत 191