आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं याचा शोध लागला, डिएनए रिपोर्टही जुळला

Human finger In Ice Cream : 12 जून रोजी मुंबईत्या मालाडमध्ये एका डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिम कोनमध्ये मानवी हाताचं बोट सापडलं होतं. पोलीस तपासात हे बोट कोणाचं याचा अखेर शोध लागला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 27, 2024, 08:44 PM IST
आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं याचा शोध लागला, डिएनए रिपोर्टही जुळला title=

Human finger In Ice Cream : मुंबईतल्या मालाड इथल्या एका डॉक्टरने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडलं होतं. डॉक्टरने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतरआईस्क्रीममध्ये  (Ice Cream) सापडलेलं बोट कोणाचं आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला. आईस्क्रीमच्या कारखान्यातील एका कर्मचाऱ्याचं हे बोट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हे  बोट कोणाचं यासाठी फॉरेन्सिक लॅबमधील अहवालाची पोलीस वाट पाहात होते. 

कुठे आणि कोणाला सापडलेलं बोट?
मालाडमध्ये राहणाऱ्या ऑर्लेम ब्रेडन सेराओ या 27 वर्षीय डॉक्टरने 12 जून रोजी एका फूड डिलेव्हरी अ‍ॅपवरुन आईस्क्रीम कोन मागवला होता. ऑर्लेम यांनी मागवलेला आईस्क्रीमचा कोन आल्यानंतर त्यांनी कव्हर उघडून तो खाण्यास सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांना त्या आईस्क्रीमच्या कोनात तुटलेलं हाताचं बोट सापडलं. हे बोट दोन सेंटीमीटर लांब होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि हे बोट कोणाचं आहे हे शोधण्यास सुरुवात केली. आईस्क्रीम कंपनीचा ब्रॅण्ड, या आईस्क्रीम कुठे बनवल्या जातात याचा माग काढत काढत पोलीस थेट पुण्याला पोहचले.

'ते' बोट कोणाचं याचा शोध लागला
आईस्क्रीममध्ये सापडेलं ते बोट आईस्क्रिम कारखानातल्या असिस्टंट मॅनेजरचं (Assistent Manager) असल्याचं समोर आलं आहे. डीएनए रिपोर्टनंतर (DNA Report) यावर शिक्कामोर्तब झालंय. पॅकेजिंग करताना हा अपघात झाला होता. कारखान्यात काम करणाऱ्या ओमकार पोटे या 24 वर्षांच्या अस्टिटंट मॅनेजरचं हे बोट आहे. मशीन सुरु असताना मशीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असताना ओमकार पोटे याचं बोट तुटलं गेलं. 

असा झाला तपास?
पोलिसांच्या तपासादरम्यान आईस्क्रिम कारखान्यामध्ये किती कर्मचारी काम करतात? ज्या आईस्क्रीममध्ये बोट सापडलं तो आईस्क्रीमचा लॉट कारखान्यातून किती तारखेला बाहेर गेला होता? यासारख्या गोष्टींचा माहिती मुंबई पोलिसांनी घेतली. या तपासामध्ये असं लक्षात आलं की या कारखान्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बोटाला काम करताना दुखापत झाली होती. या कर्मचाऱ्याच्या बोटाला झालेली जखम ताजी होती. मात्र या कर्मचाऱ्याचा झालेल्या दुखापतीमध्ये त्याच्या बोटाचा तुकडा पडला होता का? पडला होता तर यासंदर्भात तक्रार का करण्यात आली नाही? नेमकं काय घडलं होतं? या दृष्टीने तपास करण्यात आला.