Ganeshotsav 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची नवी नियमावली

सण- उत्सव साजरा करताना कोरोनाला विसरुन चालणार नाही 

Updated: Sep 7, 2021, 08:24 PM IST
Ganeshotsav 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची नवी नियमावली  title=
गणपती बाप्पा मोरया...

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या धर्तीवर सलग दुसऱ्या वर्षी या उत्सवाची धामधूम मुंबईसह राज्यातही काहीशी कमीच असेल. पण, तरीही काही ठिकाणी कोरोनाला विसरुन नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. याच धर्तीवर मुंबईत गणेशोत्सवाचं आतापर्यंतचं रुप पाहता बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून नव्यानं एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबईतील गणेशोत्सवासाठीचे नियम खालीलप्रमाणे 

- घरगुती गणेशमूर्तींची आगमन मिरवणू काढू नये. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तिंचा समूह असावा. शक्‍यतोवर या व्यक्तिंनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. गणेशाची मूर्ती ही घरगुती उत्‍सवासाठी २ फूटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी.

-  सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत याची खात्री करावी. उपस्थितांनी सर्व प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं. गर्दी टाळावी. गणपतीची मूर्ती ही सार्वजनिक उत्‍सवासाठी ४ फूटापेक्षा जास्‍त  उंचीची नसावी.  आगमनासाठी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक नको. 

-   घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. किंवा पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू/ संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे. 

-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन / मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे.  गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी 

- सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्‍यावी

- घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. 

- गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.

- घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुक काढू नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५  व्‍यक्‍ती असाव्‍यात. आगमनाप्रमाणंच इथंही लसीचे नियम लागू असतील. 

- घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्र नेवू नयेत.

- विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबा

- लहान मुले  आणि ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीची ठिकाणं टाळा. 

-  सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाही याची दक्षता घ्या.  मिरवणूक काढू नका. 

- सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे.  

- यंदाच्या वर्षी गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही. 

- प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करायचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे.  सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावी.