दीपक भातुसे / नागपूर : भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.
राज्यात आतापर्यंत ५३ टोल लहान वाहनांसाठी बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आणखी करणे कठीण आहे. मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल बंदी करणं कठीण आहे, असे सांगत जे टोल बंद केले गेले आहेत, त्यापोटी ४०० कोटी रुपये मोजले आहेत, असे पाटील यांनी यावेळी माहिती दिली.
मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल बंदी करणं कठीण आहे. कारण मुंबई प्रवेशद्वारावरील टोल बंद करण्यासाठी सरकारला अधिक रक्कम मोजावी लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती याआधी देण्यात आली होती. त्यामुळे टोल मुक्तीचे केवळ आश्वासन राहणार असेच सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात टोलमुक्तीवरुन भाजप अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल बंदी करणं कठीण, अद्याप निर्णय नाही- चंद्रकांत पाटील
- रस्ते विकास महामंडळाने ५३ टोल छोट्या वाहनांसाठी बंद केले
- यासाठी ४०० कोटी रुपये कंपन्यांना परतफेड म्हणून दिले आहेत
- पण मुंबई प्रवेशद्वारावरील टोल बंद करण्यासाठी सरकारला अधिक रक्कम मोजावी लागणार आहे
- त्यामुळे या संदर्भातील अहवाल राज्याच्या वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे
- त्यामुळे अजून मुंबई प्रवेशद्वारावर असलेले पाच टोल बंद करण्याचा निर्णय झालेला नाही
- वित्त विभागाच्या अभिप्रायनंतर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नत्तराच्या तासात सांगितले.