मुंबई : दोन महिन्याहून अधिक काळ आपण कोरोनाशी लढा देतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये विभागण्यात आला आहे. लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. डॉक्टर्स, पोलीस, सफाई कर्मचारी हे सारे कोरोना वॉरिअर्स एकत्र येऊन लढा देत आहेत. यामध्ये मुंबई महानगर पालिकेचे अभियंते देखील महत्वाची कामगिरी बजावत आहेत.
आयसोलेशन वॉर्ड तयार करणे, क्वारंटाईन सेंटर तयार करणे, रुग्ण, पोलीस, डॉक्टरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहणे असा अनेक प्रकारची कामे महापालिकेचे अभियंते उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. अभियंते हे महापालिका आणि डॉक्टर्स यांच्यातला दुवा म्हणून काम करत आहेत.
कोरोना ड्यूटीवर असताना कोणतेही काम तेवढ्याच तत्परतेने करू शकतात हे सतत कार्यरत असलेल्या अभियंत्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. शहरासाठी लॉकडाऊन असताना अभियंत्यांचे पाणी पुरवठा, नाले सफाई, रस्ते बनवणे, खड्डे बुजवणे अशी कामे तर सुरुच आहेत.
त्यामुळे डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्यासोबत अभियंत्यांचा सन्मान देखील व्हायला हवा अशी भावना व्यक्त होतेय.