Andheri Prostitution busted: गरजू महिलांची पैशाची गरज ओळखून त्यांना वेश्या व्यवसायाकडे ओढण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या अंधेरीतून समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळाताच मोठ्या शिताफीने त्यांनी हा व्यवसाय उधळून लावला. तसेच निष्पाप महिलांची यातून सुटका केली.
राबिया शेख ही गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून वैश्या व्यवसाय करायला भाग पाडत असल्याची तक्रार अंधेरी पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. यानंतर पोलीसांनी या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी सापळा रचला.
त्यानुसार पोलिसांनी एक बोगस ग्राहक उभे केले आणि आरोपी राबिया शेखपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलीस राबियामार्फत अंधेरी पूर्व भागातील शालिमार गेस्ट हाऊस येथे पोहोचले. राबियाला आपल्यासोबत काय होणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती. नियमित येणारे ग्राहक समजून ती बोगस ग्राहकांना पीडित महिलांपर्यंत घेऊन गेली. यावेळी पैसे देतानाच पोलिसांकडून पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन 15 हजार रुपयांचा एक मोबाईल, रोख रक्कम चार हजार रूपये आणि 1 पेन ड्राईव्ह हस्तगत केल्याची माहिती देण्यात आली.
अंधेरीतील नागरदास रोड परिसरातील विविध हॉटेलमध्ये हा व्यवसाय चालायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
जोगेश्वरी सर्वोदयनगर आणि आजुबाजूच्या परिसरातील गरजू महिलांना आणि मुलींना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायाकडे वळवले जात होते. अधिक पैसा मिळेल हे सांगून राबिया महिला आणि मुलींना घेऊन अंधेरीतील हॉटेलमध्ये यायची. पण राबिया या महिलांना कामाचा मोबादला देत नव्हती. मिळालेले पैसे ती स्वत:साठी ठेवायची. पीडित महिलांना नाममात्र रक्कम मिळायची, अशी माहिती पीडित महिलांनी पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता.
अंधेरी पोलिसांनी राबिया शेखविरोधात भा.द.वी कलम 370( 1) सह 4, 5 अनैतिक व्यापार प्रतिबंध आधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली.