Mumbai Crime : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत एक अख्खा पूल चोरीला (iron bridge stolen) गेल्याची माहिती समोर आली आहे. चोरी लोखंडी गेलेला पूल हा 6 हजार किलो वजनाचा आणि नव्वद फूट लांब आहे. मात्र एवढा मोठा पूल नेमका चोरीला कसा गेला याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जूनमध्ये हा पूल चोरीला गेल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मुंबईच्या मालाड भागात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. हा तात्पुरता लोखंडी पूल गेल्या वर्षी जून महिन्यात एका नाल्यावर टाकण्यात आला होता. या पुलावरुन अदानी इलेक्ट्रिसिटीची केबल जाणार होती. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यात कायमस्वरूपी पूल आल्याने तो पूल तिथून काढण्यात आला होता. मात्र तो आता चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. दोन लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला हा पूल क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला होता. 26 जून रोजी अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी या पुलाची पाहणी करण्यासाठी तिथे गेले असता त्यांना हा पूल गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
नाल्यावरील लोखंडी पूल काढून जिथे ठेवण्यात आला होता तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासामध्ये पोलिसांना आढळले की काही लोकांनी गॅस कटरच्या साहाय्याने पूल हळूच कापून काढला होता. त्यानंतर तो हळूहूळू करुन तिथून गायब करण्यात आला.
यानंतर पोलिसांनी पुलाच्या चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक कंपनीचा कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अदानी इलेक्ट्रिसिटीने त्याच व्यक्तीला पूल बांधण्याचे कंत्राट दिले होते. मात्र पूल हटवण्याबाबतची माहिती आरोपींनी अदानी इलेक्ट्रिसिटीला दिली नव्हती. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, पोलिसांनी चोरीचा सर्व माल जप्त केला आहे.
बिहारमध्ये रेल्वे इंजिन चोरीला
काही महिन्यांपूर्वी बिहारच्या चोरट्यांनी बोगदा खोदून संपूर्ण रेल्वे इंजिन गायब केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून जप्त केलेली बोगी रेल्वेच्या इंजिनच्या विविध भागांनी भरलेली होती. चोरांच्या एका टोळीने बरौनी येथील गरहरा यार्ड येथे दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेले होते. पोलिसांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगाराच्या गोदामातून इंजिनच्या भागांच्या 13 गोण्या जप्त केल्या होत्या.