Mumbai Crime : कोणत्याही खेळाडूचं स्वप्न असतं की त्याने देशासाठी खेळावं. मात्र राष्ट्रीय पातळीवरही चांगली कामगिरी करुनही एखाद्या खेळाडूवर अशी वेळ येते की त्याला गुन्हेगारीकडे वळावं लागतं. मुंबईतूनही एका राष्ट्रीय स्तरावरील एका खेळाडूबाबत अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या एका खेळाडूला सोनसाखळी चोरल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळणाऱ्या एका खेळाडूला वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याप्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी अटक केली. मुंबईती बांगूर नगर पोलिसांनी 25 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल खेळाडूला अटक केली आहे. गोरेगाव पश्चिम येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचल्याचा आरोप या खेळाडूवर आहे. आकाश धुमाळ असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
गोरेगाव येथे एका 60 वर्षीय महिलेचे सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी 25 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल खेळाडू आकाश धुमाळला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केल्यानंतर पैसे बुडाल्याने आकाश धुमाळने कर्ज फेडण्यासाठी हे पाऊल उचललं होतं. शेअर बाजारात नुकसान झाले तेव्हा त्याची भरपाई करण्यासाठी आकाशने सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकल्यानंतर धुमाळ कॉल सेंटरमध्ये काम करू लागला. गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये राहणाऱ्या आकाश धुमाळने या काळात शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती. त्यासाठी त्याने 16 लाखांचे कर्जही घेतले होते. शेअर बाजारातून आकाशला मोठ्या नफ्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही. शेअर बाजारात त्याला मोठा तोटा झाला आणि आकाशचे पैसे बुडाले.
पैसे परत न केल्याने ज्यांच्याकडून आकाशने कर्ज घेतले होते त्यांच्याकडून त्याला धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा मार्ग निवडला. रविवारी त्याने एका 60 वर्षांच्या महिलेचा पाठलाग करून इंदिरा नगर भागात जाऊन तिच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. त्यानंतर पीडित पर्सी डिसोझा यांनी या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि आकाश धुमाळला अटक केली. आकाशला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सापळा रचला होता. तो घराबाहेर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
ही घटना घडवून आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी सांगितले की, आम्ही धुमाळ यांच्या घराला वेढा घातला होता आणि त्यानंतर तो बाहेर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. आम्ही आकाश धुमाळला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धुमाळने आतापर्यंत असे किती गुन्हे केले आहेत, याचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.