Sanjay Raut Claim About Modi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणावी तशी कामगिरी न करता आल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑबझर्व्हर'मधून झालेली टीका असेल किंवा सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा उल्लेख करत दिलेला खोचक सल्ला असेल, मागील काही दिवसांपासून संघ उघडपणे भाजपाला कानपिचक्या देत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपामधूनच पाठिंबा मिळत नसल्याचं सूचकपपणे सांगितलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोदींना नेतेपदी निवडण्यासाठी भाजपाची बैठक न बोलावता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक बोलावण्यात आल्याचं राऊत म्हणाले.
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील लोकशाही आणि संविधनाच्या संरक्षणसाठी भूमिका घ्यावी लागेल. मागील 10 वर्षांमध्ये मोदी, शाहांनी जे देशाचं नुकसान केलं आहे त्याला संघही जबाबदार आहे. लोकशाहीचं, देशातील लोकांचं, मणिपूरचं, काश्मीरचं जे नुकसान केलं आहे त्यासाठी संघही तेवढाच जबाबदार आहे. संघाच्या समर्थनाने हे सरकार तयार झालं आहे. त्यांना चूक दुरुस्त करायची आहे तर हे चांगलं आहे. आरएसएस काय करतंय यावर आमचंही लक्ष आहे," असं संजय राऊत म्हणाले.
पत्रकारांनी राऊत यांना, "मोहन भागवत यांनी योगींची भेट घेतली आहे. मात्र मोदींना भेटलेले नाहीत. त्यामुळे कुठेतरी टाळाटाळ सुरु आहे असं वाटतं का?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी एक खळबळजनक विधान केलं. "दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे, भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये मोदींची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मोदींची नेतेपदी निवड झाली, अशी माहिती माहिती आहे. जर भाजपाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता," असं म्हणथ राऊत यांनी मोदींना भाजपामधूनच विरोध होत असल्याचं सूचित केलं. तसेच पुढे बोलताना मोदींची भाजपाच्या बैठकीत नेतेपदी निवड न झाल्याने "राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची भाजपासहीत बैठक बोलवून त्यामध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> '..तर तुमच्याविरुद्ध वॉरंट जारी करावं लागेल'; कोर्टाची भुजबळांना तंबी! अडचणी वाढणार?
पत्रकारांबरोबरचा संवाद संपवताना राऊत यांनी, "नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसांचे पाहुणे आहेत. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय," असं आवर्जून नमूद केलं.