मुंबई : मुंबईतल्या मालाड स्टेशनबाहेर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाले भिडले आहेत. यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह २० ते २५ मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दादरमध्येही फेरीवाल्यांचे धंदे मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावले आहेत.
मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. मनसे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत का याची पाहणी करत होते, तेव्हा फेरीवाल्यांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. मालाड रेल्वे स्टेशन पश्चिम येथे हा हल्ला करण्यात आला.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. राज ठाकरे स्वत: घटनास्थळी जाण्यासाठी निघाले होते, पण गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी असल्यामुळे राज ठाकरे माघारी परतले. उद्या सकाळी रुग्णालयात जाऊन ते जखमी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची विचारपूस करणार आहेत. दरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना दिलेल्या चिथावणीमुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे.