मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब; व्यासपीठावर सावरकरांचा फोटो

आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Updated: Jan 23, 2020, 10:20 AM IST
मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब; व्यासपीठावर सावरकरांचा फोटो title=

मुंबई: राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) भविष्यात हिंदुत्वाचा नवा अजेंडा घेऊन वाटचाल करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसेच्या नव्या भगव्या रंगातील झेंड्याची चर्चा सुरु आहे. आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी मनसेने भगव्या रंगातील झेंडा स्वीकारल्याची चर्चा सुरु होती. 

मात्र, आज गोरेगाव येथे होत असलेल्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची तसबीर पाहायला मिळाली. थोड्यावेळात याठिकाणी राज ठाकरे अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येईल. यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तसबिरी मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाचा अजेंडा घेऊनच लढेल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. 

शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन नव्याने वाटचाल करण्यासाठी राजकीय स्पेस उपलब्ध झाली आहे. अशावेळी मनसेला भाजपची साथ मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.