नव्या वाटचालीसाठी राज ठाकरेंना 'त्या' ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका दूरध्वनी संभाषणाची क्लिप शेअर करण्यात आली आहे.

Updated: Jan 23, 2020, 09:47 AM IST
नव्या वाटचालीसाठी राज ठाकरेंना 'त्या' ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद title=

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे मनसेच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करणार आहेत. गेल्या काही निवडणुकांत आलेल्या अपयशानंतर राज ठाकरे आता हिंदुत्वाची नवी वाट चोखाळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या नव्या वाटचालीसाठी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका दूरध्वनी संभाषणाची क्लिप शेअर करण्यात आली आहे. यामध्ये माधव लेले हे ज्येष्ठ शिवसैनिक मनसेला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ऐकायला मिळत आहे. तसेच मनसेने आगामी काळात बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारायला हवे, असा सल्लाही या शिवसैनिकाने दिला आहे. 

त्यामुळे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतल्यास त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन नव्याने वाटचाल करण्यासाठी राजकीय स्पेस उपलब्ध झाली आहे. अशावेळी मनसेला भाजपची साथ मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्यासाठी मनसेच्या झेंड्यातही बदल करण्यात आला आहे. आजच्या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेकडून दोन झेंडे तयार करण्यात आले आहेत. हे दोन्ही झेंडे भगव्या रंगाचे असून त्यापैकी पहिल्या झेंड्यावर  छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. मात्र, झेंड्यावर राजमुद्रेची प्रतिमा असण्याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मनसेकडून पर्याची झेंडाही तयार करण्यात आला आहे. या झेंड्यावर इंजिनाची प्रतिमा असेल. हे दोन्ही प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत.