थेट अयोध्येत झळकले 'भगवाधारी' मनसेकडून जोरदार तयारी

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची जोरदार तयारी

Updated: Apr 19, 2022, 03:54 PM IST
थेट अयोध्येत झळकले 'भगवाधारी' मनसेकडून जोरदार तयारी title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची (Ayodhya) घोषणा केल्यानंतर मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या 5 जूनला राज ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. याचसंदर्भात आज राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 

दौऱ्या करण्यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहोत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bal Nandgoankar) यांनी दिली आहे. हा दौरा इव्हेंट नसेल, आम्ही रामलल्लाचं दर्शन घ्यायला जात आहोत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगतिलं. 

अयोध्येत झळकले पोस्टर्स
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसे तयारीला लागली आहे. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. त्यानंतर आता थेट अयोध्येतही राज ठाकरे यांचं पोस्टर्स झळकले आहेत. मनसे पदाधिकारी महेश कदम यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स अयोध्येमध्ये लावले आहेत. 

या पोस्टरवर राज ठाकरे यांचा भगवी शाल पांघरलेला फोटो असून बाजूला राजतीलक की करो तयारी आ रहा है भगवा धरी असा उल्लेख बॅनर वर करण्यात आला आहे.

मनसे कार्यकर्त्यांसाठी ट्रेन बुक
अयोध्या दौऱ्यासाठी मनसे (MNS) कार्यकर्ते देखील उत्सूक आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्याना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे सेनेकडून या ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 

राज ठाकरे यांना विशेष सुरक्षा
दुसरीकडे राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यादरम्यान विशेष सुरक्षा केंद्र सरकार देणार आहे. राज यांच्या अयोध्या दौ-यावेळी PFIचे सदस्य गोंधळ घालू शकतात. त्यामुळेच राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्य़ासाठी हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय.