दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: May 20, 2024, 10:00 PM IST
दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास title=
IAS Anju Sharma Success Story

IAS Anju Sharma Success Story: सध्या दहावी, बारावीच्या निकालाचे दिवस आहेत. बोर्डाची परीक्षा म्हणून आपल्याकडे या निकालाला खूप महत्व दिले जाते. कोणाला किती टक्के मिळाले? कोण पहिला आला? अशा चर्चा रंगतात. यात अनुत्तीर्ण विद्यार्थी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा समजून आपल्या भविष्याची काळजी करत राहतात. पण असे अनेक विद्यार्थी आहेत, जे दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होते. पण त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. उत्तीर्ण झाले. आणि आज आएएस पदापर्यंत पोहोचले आहेत. आएएस अंजू शर्मा यातीलच एक उदाहरण आहे. 

महत्वाच्या परीक्षेत गोंधळून जायच्या

अंजू शर्मा या 1991 च्या बॅचच्या अधिकारी असून त्या गुजरात केडरमध्ये तैनात आहेत. अंजू यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षे होते. राजकोटमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेतील कारकिर्दीला सुरुवात केली. हे आता ऐकायला खूप छान वाटते. पण अंजू शर्मा या काही लहानपणापासून हुशार असलेल्या विद्यार्थ्यांपैकी नव्हत्या. महत्वाच्या परीक्षेत गोंधळून जायच्या. यामुळे त्या दहावीच्या पूर्व बोर्ड परीक्षेत नापास झाली. यानंतर बारावीत पुन्हा नापास झाल्या. मात्र, इंटरमिजिएटमध्ये त्या केवळ अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या होत्या. बाकी सर्व विषयात त्यांना डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले होते. 

पालकांची भूमिका खूप महत्वाची 

आपला पाल्य अनुत्तीर्ण होत असले अशा वेळी पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. अंजू यांच्या बाबतीतही तेच झाले. बारावीत नापास झाल्यानंतरही अंजू शर्मा यांना त्यांच्या आईने खूप साथ दिली. आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतोय ते तंत्र योग्य नसल्याचे अंजू यांच्या लक्षात आले. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपल्या कमतरता काय आहेत? हे त्यांनी ओळखले आणि त्यावर काम करायला सुरुवात केली. 
यानंतर मात्र त्यांच्या करिअरने वेग पकडला. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून बीएससी आणि नंतर एमबीए केले. कॉलेजमध्ये त्या सुवर्णपदक विजेत्या होत्या.

कठोर परिश्रम आणि संयम

अंजू शर्मा सध्या गुजरातची राजधानी गांधीनगर येथे असलेल्या राज्य सचिवालयात शिक्षण विभागात (उच्च आणि तंत्रशिक्षण) मुख्य सचिव आहेत. कठोर परिश्रम आणि संयम यावर आपला विश्वास असल्याचे त्या सांगतात. शेवटच्या क्षणाच्या तयारी करायला गेलात तर काहीच हाती लागणार नाही, असे त्या सांगतात. त्यामुळे काम कोणतेही असो ते नियोजनबद्ध पद्धतीने करायचे हा त्यांचा शिरस्ता असतो.

स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे अंजू यांचा प्रवास पाहून लक्षात येते. शालेय परीक्षेत नापास होण्यापासून ते बोर्डाच्या परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवण्यापर्यंत आणि त्यानंतर कॉलेजमध्ये सुवर्णपदक मिळवण्यापासून ते पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रवास त्यांनी अनुभवला. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या निकालात मनासारखे गुण मिळाले तर शुभेच्छाच. पण कमी गुण मिळाले, अनुत्तीर्ण झालात तरी काही काळजी करु नका. पुन्हा तयारीला लागा. स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा. मग यश तुमच्याजवळच असेल.