Raj Thackeray | शिवजयंती तिथीनुसारच का? मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं कारण

शिवजयंती (Shivaji Maharaj Jayanti) ही तिथीनुसारच साजरी करायची, असं सांगत त्यामागील कारणही मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांनी सांगितलंय.  

Updated: Feb 19, 2022, 03:17 PM IST
Raj Thackeray | शिवजयंती तिथीनुसारच का? मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं कारण title=

मुंबई : संपूर्ण राज्यात आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती (Shivaji Maharaj Jayanti) साजरी केली जात आहे. विविध जिल्ह्यांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आजची शिवजंयती ही तारखेप्रमाणे आहे. शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करायची की तारखेप्रमाणे याबाबत अनेक मत-मतांतरे आहेत. दरम्यान शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करायची, असं सांगत त्यामागील कारणही मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांनी सांगितलंय. ते चांदिवलीत बोलत होते. (mns chief raj thackeray reaction on shivjayanti after party office inauguration at chandivali)

राज ठाकरे काय म्हणाले? 

"तुमचं दर्शन व्हावं या एकमेव उद्देशाने मी स्टेजवर आलोय, मी काय हारतुरे घ्यायला आलो नाही. आज शिवजयंती आहे. आज शिवजंयती आपण तिथीने साजरी करतो.  याचा अर्थ आज साजरी करायची, असा नव्हे.  आमच्या छत्रपतींचा जयजयकार, आमच्या छत्रपतींची जयंती ही 365 दिवस साजरी करावी, असं मला वाटतं", असं राज ठाकरे म्हणाले. त्यांनी चांदिवलीत मनसेच्या शाखेचं उद्धाटन केलं. यानंतर ते बोलत होते.  

शिवजंयती तिथीनेच का?

"शिवजयंती आजही साजरी केली तरी हरकत नाही. तसेच तिथीनुसार साजरी केली तरी हरकत नाही. पण तिथीनेच का? त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे जितके सण येतात, दिवाळी, गणपती जेवढे सण येतात हे आपण तिथीनेच साजरे करतो, तारखेने साजरे नाही करत. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती, या वर्षीही त्याच तारखेला असेल असं नाही. गणेशोत्सव सुद्धा तिथीनेच येतं", असं मनेसप्रमुखांनी स्पष्ट केलं. 

"जन्मदिवस, वाढदिवस हे आपले. महापुरुषांचा त्यातही शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा आपल्यासाठी सण आहे. म्हणूनच तो सण आपण तिथीनेच साजरा करायचा", या कारणामुळेच आपण शिवजंयती तिथीनेच साजरी करायची असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.