Maharashtra Politics : राज्यातील सत्तातरानंतर ठाकरे गट (Thackeray Group) विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा मोठा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाहायला मिळतो आहे. दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर आल्यानंतर मोठा प्रमाणात वाद झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीही प्रभादेवी परिसरात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादाला आता वेगळं वळण लागलं आहे. दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे आणि समोरासमोर आल्यानंतर हाणामारी झाली होती. यावेळी सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र सदा सरवणकर यांनी आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातून मोठा खुलासा
अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत झालेल्या राड्यानंतर दादर पोलीस ठाण्यात सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातूनच गोळीबार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेनंतर सदा सरवणकर यांचं परवाना असणारं पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केलं होतं. दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सदा सरवणकर यांच्याविरोधात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार पोलीस ठाण्याच्या परिसरात ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सरवणकरांच्याच बंदुकीत सुटल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत सदा सरवणकर समर्थक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक समोरासमोर आले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री प्रभादेवीतरात्री शिंदे गट आणि शिवसैनिक समोरासमोर आला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दादर पोलीस ठाण्यात आंदोलन सुरु केले. त्यानंतर तिथे आलेल्या सदा सरवणकर यांनी त्यांच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी सरवणकर यांनी झाडलेली गोळी एका पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती, असा दावा ठाकरे गटाने केला होता.
या सर्व आरोपांनंतर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत त्यांच्याकडील पिस्तुलही जप्त करण्यात केले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत बॅलेस्टिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरुन जप्त केलेले काडतूस आणि सरवणकर यांच्या पिस्तुलाच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यामध्ये सदा सरवणकर यांच्या बंदुकीतूनच गोळी सुटल्याचे समोर आहे.