Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीची जाहिरात येण्यापासून ते अगदी ही सोडत जाहीर होण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेदरम्यान घरं घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. पण, याच म्हाडाच्या एका सोडतीनंतर मात्र अर्जदारांचा उस्ताह चक्क मावळल्याची वस्तुस्थिती समोर आल्यामुळं आता म्हाडापुढं अडचणी उभ्या राहिल्या आहेत. हक्काचं आणि खिशाला परवडेल अशा दरात घर घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी म्हाडाकडून मोठी मदत होते. विविध सवलती आणि मुख्य प्रवासाहीतील शहरांमध्ये गृहसंकुलं उभारत म्हाडाकडून घरं उपलब्ध करून दिली जातात.
अशाच गृहप्रकल्प योजनेतून म्हाडानं विरार- बोळींज येथेही कैक हजार घरांची निर्मिती केली. पण, आजही ही घरं तशीच्या तशीच खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील सुमारे दहा हजार गृह प्रकल्पातील तब्बल 5194 घरांची विक्री अद्याप झालेली नाही. ज्यामुळं आता एकदोन नव्हे, तर तब्बल दीड हजार कोटीं या घरांची विक्री करण्याचं आव्हान म्हाडापुढं आहे.
तयार घरांची विक्री करण्यासाठी आता म्हाडा एकगठ्ठा घरांच्या विक्रीचा पर्याय अवलंबताना दिसत असून त्यासाठीच्या निवीदा जारी करण्यात आल्या आहेत. निविदेनुसार एका वेळी 100 घरं खरेदी करणाऱ्यांना घरांच्या विक्री दरात 15 टक्क्यांनी सवलत दिली जाणार आहे.
म्हाडा कोकण मंडळानं विरार - बोळींजमध्ये 10 हजार घरांचा प्रकल्प उभारला. प्रकल्पातील काही घरं विकली गेली मात्र अद्यापही 5194 घरांची विक्री झालेली नाही. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आणि सातत्यानं सोडत काढूनही या घरांना अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळालेला नाही ही परिस्थिती. घरांची विक्री न झाल्यामुळं त्यांच्या देखभालीचा खर्चही मंडळाला करावा लागत आहे. शिवाय भूखंड व्याप्तीसोबतच कोकण मंडळाचा साधारण 1500 रुपयांचा महसूलही थकला आहे. त्यामुळं या घरांची शक्य तितक्या लवकर विक्री करण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे. फक्त विरार- बोळींजच नव्हे, तर म्हडाच्या इतर विभागीय मंडळांमध्येही असंच काहीसं चित्र असून, जवळपास तीन हजार कोटींची 11 हजार घरं अद्याप खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रतीक्षेत असणाऱ्या या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा प्राधिकरणाने नवीन धोरण तयार केलं, असून म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. ज्यानंतर आता कोकण मंडळाने या तरतुदींची अमलबजावणी करत घरांची विक्री सुरु केली आहे.