रिक्षावाला विरुद्ध मर्सिडीज! महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद

रिक्षावाल्यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलाय कलगीतुरा 

Updated: Jul 5, 2022, 10:11 PM IST
रिक्षावाला विरुद्ध मर्सिडीज! महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद title=

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक रिक्षावाला चांगलाच गाजतो आहे. आणि त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. कधीकाळी पोटापाण्यासाठी ठाण्यात त्यांनी रिक्षा चालवली. राजकारणातही वाट पाहून पाहून शेवटी या रिक्षावाल्यानं सगळ्यांचीच पुरती वाट लावली.  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तीन चाकी सरकार या रिक्षावाल्यानं उलटंपालटं करून टाकलं.

उद्धव ठाकरेंच्या सरकारला या रिक्षावाल्यानं ब्रेकच लावला नाही.  तर ठाकरेंऐवजी ते स्वतःच मुख्यमंत्रीपदाच्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसले. रिक्षा चालवणारा हा सामान्य शिवसैनिक थेट राज्याचा मुख्यमंत्री झाला. 

आता याच रिक्षावाल्यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय...

'रिक्षावाल्या' शिंदेंना ठाकरेंचे टोले
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता, सुसाट सुटला होता. अपघात तर होणार नाही ना? असं टेन्शन सगळ्यांना आलं होतं. अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टोलेबाजी केली. शिवसेना भवनातल्या महिला आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. 

अर्थात एकनाथ शिंदेंनीही त्यावर जोरदार पलटवार केला. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! असं ट्वीट एकनाथ शिंदेंनी केल्यानं रिक्षा विरुद्ध मर्सिडीज वादाला तोंड फुटलंय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रिक्षावाल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं सांगत या वादात उडी घेतली..

महाराष्ट्राच्या राजकारणातला हा रिक्षा विरुद्ध मर्सिडीज वाद आता कोणतं वळण घेतो, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.. उद्धव ठाकरे हे स्वतः मर्सिडीज चालवतात. पण रिक्षावाल्या शिंदेंनी त्यांची सत्ता हिसकावून घेतली आणि मर्सिडीजची हवाच निघाली.  रिक्षाच्या स्पीडपुढं मर्सिडीजचा स्पीड सध्या तरी खरंच फिका पडलाय.