मुसळधार पावसातही कर्तव्यापासून हटला नाही, गाडी बंद तर घोड्यावरुन केली फूड डिलिव्हरी

सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचं होतंय कौतुक, आता कंपनीनेही केली मोठी घोषणा

Updated: Jul 5, 2022, 09:48 PM IST
मुसळधार पावसातही कर्तव्यापासून हटला नाही, गाडी बंद तर घोड्यावरुन केली फूड डिलिव्हरी title=

Trending News : ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी (Swiggy) या कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईचा असल्याचा दावा करण्यात आला आहे

एक स्विगी डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसातही घोड्यावर स्वार होऊन आपल्या ग्राहकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी जात असल्याचं व्हिडिओमध्ये पाहिला मिळतंय. त्यादरम्यान कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मुसळधार पावसात स्विगी डिलिव्हरी बॉयच्या या धाडसाचे कौतुक केलं आहे. आता स्विगी कंपनीनेही यावर एक घोषणा केली आहे.

स्विगी कंपनीने एका अधिकृत निवेदन जारी म्हटलंय, एक व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे, ज्यामध्ये एक डिलिव्हरी बॉय आमच्या कंपनीची मोनाग्राम असलेली बॅग घेऊन घोड्यावर स्वार होऊन फूड डिलिव्हीर करत आहे.

त्या डिलिव्हरी बॉयने दाखवलेलं कर्तव्य आणि धाडसाचं श्रेय त्याला द्यायचं आहे, पण तो डिलिव्हरी बॉय नेमका कोण आहे याची ओळख आम्हाला पटलेली नाही, असं स्विगी कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. 

कंपनीच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की तो तरुण कोण आहे आणि इतक्या मुसळधार पावसात मुंबईच्या रस्त्यावर डिलिव्हरी देण्यासाठी का बाहेर पडला? दुसरा प्रश्न असा आहे की, त्याने घोडा कुठे पार्क केला असेल?

कंपनीने इंटरनेट यूजर्सना त्या अनोळखी व्यक्तीची माहिती देण्याचं आवाहनही केलं आहे. एवढेच नाही तर घोड्यावर स्वार झालेल्या डिलिव्हरी बॉयची अचूक माहिती जो कोणी देईल, त्याला पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, असंही स्विगी कंपनीने जाहीर केलं आहे.

हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. पावसात पांढर्‍या घोड्यावर स्वार झालेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचे लोक कौतुक करत आहेत.