मनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम

Maraha Reservation : पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीजवळ थांबणार की मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Updated: Jan 25, 2024, 09:21 PM IST
मनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम title=

Maraha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि लाखो मराठा समर्थकांचं (Maratha) वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. हे भगवं वादळ मुंबईत (Mumbai) धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान (Azad Maidan) तसंच शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. 

मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीस
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सकल मराठा समाज आंदोलक आपल्या वाहनांसह मुंबईत आल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे,अशी भीती मुंबई पोलिसांनी नोटिशीत व्यक्त केलीय. खारघरमधील इंटनॅशनल कॉर्पोरेशन पार्क आंदोलनासाठी संयुक्तिक राहिल, असंही या नोटिशीत पोलिसांनी सुचवलंय.

आझाद मैदानावर जरांगे ठाम
मात्र मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यावर जरांगे ठाम आहेत. त्यामुळं सरकारला चांगलाच घाम फुटलाय. जरांगेंची समजूत काढण्यासाठी सरकारी शिष्टमंडळानं लोणावळ्यात त्यांची भेट घेतली, मात्र ही बैठकही निष्फळ ठरली. आता मुख्यमंत्र्यांनीच तोडगा काढावा, अशी विनंती जरांगेंनी केलीय. तर जरांगेंनी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

फसवून सही घेतली
एका अधिकाऱ्याने माझ्याकडून एका कागदावर सही घेतली, असं जरांगेंनी म्हटलं आहे. एक कागद मराठीत आणि दुसरा इंग्रजीत होता. मी ते वाचलंच नाही. कोर्टाचं कागदपत्रं असल्याचं सांगत माझ्याकडून सही घेतली. उपोषणाला इथे बसू नका, तिथे बसू नका असं त्यावर लिहिलेलं होतं. मी झोपेत असल्याने चुकून सही केली. पण सही घेतली असली तरी आझाद मैदानातच उपोषणाला बसणार आहे असं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांनी आपल्याकडून खोटं बोलून सही केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसंच जाहीरपणे अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे. 

दुसरीकडं सकल मराठा समाजानं आझाद मैदानात उपोषण आंदोलनासाठी स्टेज बांधायला सुरूवात केली होती. पोलिसांनी नोटीस पाठवून स्टेज बांधण्याचं काम थांबवलं. मात्र काहीही झालं तरी 26 जानेवारीला जरांगे आझाद मैदानात येणारच, असा निर्धार मराठा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलाय. यामुळे इकडं आड आणि तिकडं विहीर, अशी राज्य सरकारची अवस्था झालीय.

एकीकडं मनोज जरांगे आणि लाखो मराठा आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. तर दुसरीकडं मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. यातून मार्ग काढताना सरकारला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणाराय.