MPSC विद्यार्थ्यांना दिलासा, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

रखडलेल्या नियुक्ती लवकरच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय 

Updated: Jul 13, 2021, 06:11 PM IST
MPSC विद्यार्थ्यांना दिलासा, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : राज्यात MPSC विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यात काही दिवसांपूर्वी पुण्यातील MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं आत्महत्या केल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले होते. मात्र आता राज्य शासनाकडून या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

MPSC नियुक्ती रखडलेल्या 48 SEBC विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांची लवकरच नियुक्ती करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. 2019 ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवार नियुक्तीबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत 15 हजार 711 पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुळे वित्त विभागानं भरतीवर बंदी आणली होती. मात्र आता ही पदं भरण्यासाठी बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. UPSC धर्तीवर MPSC परीक्षांचं वेळापत्रक वर्षभर आधी जाहीर करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत. 

या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भरणे यांनी दिलीय. SEBCच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. SEBC च्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी भरणे यांनी केलाय. तसंच 31 जुलैपर्यंत MPSC आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.