झोटिंग समिती फार्स होता का? खडसेंना बदनाम करण्याचा डाव होता का?, नाना पटोले यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते, भाजप हा OBC विरोधी पक्ष -  नाना पटोले

Updated: Jul 13, 2021, 05:42 PM IST
झोटिंग समिती फार्स होता का? खडसेंना बदनाम करण्याचा डाव होता का?, नाना पटोले यांचा हल्लाबोल title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा (Zoting committee) अहवाल गायब झाल्याने एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की कुणी गायब केला? अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हल्लाबोल केला आहे.

झोटिंग समिती हा एक फार्स होता का?

झोटिंग समिती हा एक फार्स होता का? एकनाथ खडसेंसारख्या माणसांना बदनाम करण्याचा डाव होता का? सवाल नाना पटोले यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग कमिटीचा अहवाल गायब होत असेल, तर खडसेंच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं होतं, असा हल्लाबोल पटोलेंनी केला आहे.  

एकनाथ खडसे यांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्यासाठी झोटिंग समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने खडसेंना क्लीन चीटही दिली होती. याच प्रकरणात सध्या ईडीकडून खडसेंची चौकशी सुरू आहे. अशावेळी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी हा अहवाल खडसे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 

'लक्ष दुसरीकडे वळवण्याचा डाव'

काँग्रेसच्या महागाईविरोधातल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी एका भाषणातली क्लिप काढून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आमच्याबद्दल असं कितीही कटकारस्थान केलं, तरी काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडत राहणार आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

'भाजप ओबीसी विरोधी पक्ष'

भाजप हे बहुजनांनाचे चेहरे वापरतात आणि वेळ आली की त्यांना डावलतात असं चित्र आपण सातत्याने पाहिलं. भाजप हा OBC विरोधी पक्ष आहे, हे आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसतं आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला वाढवलं. पण भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्यावर अन्याय केला होता. हे सर्वांना माहिती आहे. त्यांना योग्य ती जबाबदारी देण्यात आली नाही. आता त्यांच्या मुलीवर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे', अशी टीकाही पटोलेंनी केली.

फडणवीस हे खोटे बोलणारे मुख्यमंत्री

नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. नारायण राणे विधानपरिषदेचे काँग्रेसचे सदस्य असताना नागपूरच्या मुन्ना यादव संदर्भात भाष्य केलं होतं. त्यावर उत्तर देताना फडणवीस खोटे बोलले. मुन्ना यादववर राजकीय गुन्हे आहेत, कोणत्याही हत्येचे, बलात्काराचे गुन्हे नाहीत, खंडणी गोळा करण्याचे गुन्हे नाहीत, असं फडणवीस यांनी सांगितलं. पण सर्वांना माहिती आहेत मुन्ना यादववर कोणते गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे खोटं बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

निवडणुकांची रणनीती आखली

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणनिती आखण्यात आलेली आहे. आणि विशेष करुन ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो विषय आज निर्माण झालेला आहे, त्यातून मार्ग कसा काढायचा, मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय कसा द्यायचा यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचे नेते भेटतील. केंद्र सरकारवर दबाव निर्माण करुन मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका या बैठकीत ठरल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.