Sanjay Raut Exclusive : एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते - संजय राऊत

झी 24 तासच्या 'Black and White' या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप, 'केंद्रीय तपास यंत्रणांच्या बंदूका लावून त्यांना फोडण्यात आलं'

Updated: Nov 30, 2022, 05:50 PM IST
Sanjay Raut Exclusive : एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते - संजय राऊत  title=

Sanjay Raut Exclusive : शिवसेनेतून एकनाथ शिंद यांच्यासह 40 आमदारांनी बंड केलं आणि राज्यात सत्तांतर झालं. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदार फूटीचा प्रकार हा आधीपासून सुरु होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असतानाही काही जण काँग्रेसमध्ये जाणार होते. याच गटातील काही जण होते. हे तेव्हा दिल्लीत जाऊन अहमद पटेल (Ahmed Patel) यांना भेटत होते, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

आज हाच गट अमित शहा (Amit Shah) यांना भेटला, अयोध्येतून (Ayodhya) पळून जायचं असा त्यांचा प्लान होता रामाच्या साक्षीने, पण रामाने त्यांना काही मान्यता दिली नाही. मग ते कामाक्षी देवीला गेले. पण 40 आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही. हजारो-लाखो शिवसैनिक आमच्या बरोबर आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. झी 24 तासच्या 'Black & White' या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाजप आणि शिंदे गटाला घेरलं.

ईडीच्या भीतीपोटी 40 जण फुटले
काँग्रेसच्या (Congress) काळातही सरकारं पाडली गेली, भाजपच्या (BJP) काळात जास्त पाडली गेली तपास यंत्रणांची भिती दाखवून, आमची 40 लोकं फुटली त्यातल्या 20 ते 22 लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या बंदूका लावून त्यांना फोडण्यात आलं हे सर्वांना माहित आहे. त्यांच्यावरचे सर्व खटले मागे घेतले. आता हर्षवर्धन पाटील यांना सुखाने झोप लागते. भीतीपोटी लोकांनी पक्षांतर केली असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. 

उमेदवार द्यायला त्यांची हातभर फाटली
मी तुरुंगात असताना अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri By Poll Election) झाली. आमचं चिन्ह गोठवलं, आमच्या पक्षाचं नवा बदललं. तरीही जवळपास 70 हजार शिवसैनिकांनी (Shiv Sainik) बाहेर पडून शिवसेनेच्या (ShivSena) नविन चिन्हावर मतदान केलं. अंधेरी पोटनिवडणूकीत त्यांनी उमेदवार दिला नाही, कारण त्यांची हातभर फाटली, इथे जर भाजपने किंवा फुटलेल्या गटाने उमेदवार दिला असता तर त्यांचं तोंड काळं झालं असतं, त्यामुळे त्यांनी सुटकेचा मार्ग निवडला. लोकांची आजही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार श्रद्धा आहे, शिवसेना ही महाराष्ट्राची आणि काळाची गरज आहे,  आज पन्नास वर्षांनीही लोकांना असं वाटतं, याचा अर्थ असा आहे, की आम्ही सातत्याने आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, मराठी माणसाच्या, मुंबईच्या, महाराष्ट्रासाठी उभे राहिलो, आम्ही त्यापासून ढळलो नाही. आम्ही विकलो गेलो नाही म्हणूनच लोकं आम्हाला मतदान करतात असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं?
संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरु असतानाही हा प्रश्न होताच, तरीही मराठी माणूस आहे आणि तो मतदान करतो. शिवसेनेमुळे आजही मुंबईवर मराठी माणसाचा पगडा आहे.  उद्धव ठाकरे यांनी जर लक्ष घातलं नसतं तर कोरोनाच्या काळात ज्या सुविधा मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या, त्या कधीच झाल्या नसत्या असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.