शिवसेना वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?, भाजपाला 6 तर शिवसेनेला 'इतक्या' जागा... सूत्रांची माहिती

सर्वोच्च न्यायायलयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. यासाठी शिंदे गट आणि भाजपातील अनेक नेते मंत्रीपदाच्या अपेक्षेत आहेत. 

राजीव कासले | Updated: Jun 6, 2023, 01:54 PM IST
शिवसेना वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?, भाजपाला 6 तर शिवसेनेला 'इतक्या' जागा... सूत्रांची माहिती title=

Maharashtra Politics : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला (Shinde-Fadanvis Government) सत्तेत येऊन आता जवळपास 11 महिने पूर्ण झाले आहेत. पण अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. आता शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येतेय. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन (Shivsena Vardhapan Din) आहे. त्या आधी विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात भाजपच्या (BJP) 6 तर शिवसेनेच्या चौघांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.. मात्र मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांची महामंडळावर बोळवण होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण भाजपच्या चौघांना कॅबिनेट मंत्री तर दोघांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.. तर  शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळतील असं बोललं जातंय. 

लवकरच मंत्रीमंडळ विस्तार
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल महिन्याहून अधिक काळ राज्याला मंत्रिमंडळ नव्हतं. शिंदे आणि फडणवीस दोघंच जण सरकार चालवत आहेत अशी अनेकदा टीका देखील त्यांच्यावर झाली होती. अखेर महिन्यानंतर भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे. सर्वोच्च न्यायायलयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा रंगल्या आहे.

दुसरीकडे, लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्हाला हलक्यात घेऊ नका असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाला दिलाय. धाराशिवची लोकसभेची जागा शिंदे गटच लढवणार असंही सावंतांनी ठासून सांगितलंय. सावंतांच्या या भूमिकेचं फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरेंनी समर्थन दिलंय. आमच्या ज्या जागा आहे. त्या जागा आम्ही मागणारच त्यात गैर काय? असं सांगत भुमरे यांनी तानाजी सावंत यांचं समर्थन केलं आहे. 

संघटनात्मक बदलाच्या हालचाली
दरम्यान, भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू झाल्यायत.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलणार आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचसंदर्भात आज मुंबईत भाजप कोअर ग्रुपची बैठक होतेय. चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षेत होणा-या या बैठकीत बदलांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.