सीमा आढेसह कपिल राऊत झी मीडिया, मुंबई : महायुतीतल्या भाजपने त्यांचे 99 उमेदवार जाहीर केलेत. महायुतीत एकट्या भाजपने (BJP) उमेजवार जाहीर केले. पण उमेदवार जाहीर करताना भाजपनं शिवसेनेच्या 5 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. भाजपच्या या कृतीमुळं महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचं सांगण्यात येतंय.
धुळे, उरण, अचलपूर, नालासोपारा आणि देवळी या मतदारसंघांत भाजपनं उमेदवार जाहीर केलेत. शिवसेनेच्या (Shivsena) इच्छुकांनी या मतदारसंघांमध्ये लढण्याची तयारी केली होती. त्यामुळं त्या नाराजांची समजूत काढण्याचं शिवसेनेसमोर आव्हान असणार आहे. शिवसेनेनं साठ उमेदवारांची यादी महायुतीच्या बैठकीत सादर केल्याचं सांगण्यात येतंय. त्या उमेदवारांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवण्यात आलीय. मात्र 25 जागांवर अजूनही भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे. जागांचा वाद मिटवण्यासाठी आता नेत्यांनी दिल्ली गाठलीये.
शिवसेना आणि राष्ट्रवादीनं उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी विद्यमान आमदारांना एबीफॉर्म देण्यासा सुरुवात केलीय. जागावाटपात शिवसेना आणखी काही जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. महायुतीत जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसू लागलीयेत. सध्याचा पेचप्रसंग पाहता येत्या दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येतंय.
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला?
दरम्यान, महायुतीचा सभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला झी 24 ताससच्या हाती लागलाय. यानुसार भाजप 150-160 विधानसभा जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदेंची शिवसेना 70-75 जागा लढणार असल्याची माहिती आहे, तर
अजित पवारांची राष्ट्रवादी 50- 55 लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होतेय. मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारी यादी किंवा जागावाटप झाले नाही. भाजपने 99 जागांवर उमेदवार दिलेत. तर राष्ट्रवादीने 18 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही त्यामुळे जागा कोणाला आणि उमेदवार कोण हा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.