'घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं'; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका

Uddhav Thackeray : अटल सेतूचं उद्घाटन केलं पण त्यामध्ये अटलजींचा फोटो कुठे होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवडी नाव्हा शेवा या देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे उद्घाटन केलं होतं.

आकाश नेटके | Updated: Jan 13, 2024, 10:41 AM IST
'घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं'; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका title=

Maharashtra Politcis : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकार्पण केलं. त्यामुळे 22 किमी लांबीच्या या सागरी सेतूवरुन अवघ्या 20 मिनीटांमध्ये मुंबईतून नवी मुंबईला पोहोचता येणार आहे. तसेच नाशिक येथे सुरु झालेल्या युवा महोत्सवाला देखील पंतप्रधान मोदींनी सुरुवात केली. यावेळी त्यांनी घराणेशाहीवरुन टीका केली. त्यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. तसेच राम मंदिरात स्वःताची मूर्ती न लावता प्रभूश्रीरामाची मूर्ती लावा असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.

"राम मंदिराच्यावर बाबरी मशिद बांधली त्याप्रमाणे सोमनाथ मंदिराचा सुद्धा अनेकदा विद्धंस केला होता. तेव्हा सरदार वल्लभभाई यांनी पुढाकार घेतला. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सरदार वल्लभभाई पटेल नव्हते. सोमनाथ मंदिराच्या लोकापर्णासाठी देशाच्या राष्ट्रपतींनी आमंत्रिक केले होते आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी सुद्धा देशाच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना आमंत्रित करावं. ते करतील की नाही माहिती नाही. आम्ही 22 तारखेच्या काळा राम मंदिरातील पूजेसाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करत आहोत," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

"मी पंडित नाही, पण कडवट हिंदू आहे. राम मंदिर व्हावं ही माझीसुद्धा इच्छा आहे. आता यातल्या शास्त्रानुसार जे मुद्दे आहेत ते मला माहिती नाहीत. काही जणांना सवय असते की माहिती नसलं की ठोकून बोलायचं. मी त्यातला नाही. शंकराचार्यांनी काही शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तिथल्या न्यासाने पाहावेत," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

"अटल सेतूचं उद्घाटन केलं पण त्यामध्ये अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही. कोणाचीही मूर्ती लावतील. नाव अटल सेतू पण अटलजींची फोटोच नाही. त्यामुळे कृपा करा की त्या मंदिरात स्वःताची नव्हे तर प्रभू श्रीरामाची मूर्ती लावा. प्रभूरामचंद्र दशरथ राजाचे पूत्र होते. त्यावेळी सुद्धा त्यांना वनवास भोगावा लागला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याबद्दल पंतप्रधान बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.