धारावीत टेस्टच होत नाहीत, खरे आकडे लपवले जातायंत- दरेकर

धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर आहे.

Updated: Jun 7, 2020, 02:37 PM IST
धारावीत टेस्टच होत नाहीत, खरे आकडे लपवले जातायंत- दरेकर title=

मुंबई: राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय घट झाल्याचे समोर आले होते. तसेच गेल्या नऊ दिवसांत धारावीतील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे धारावीत कोरोना नियंत्रणात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आकडे लपवण्याच्या नादात धारावीतील लोकांच्या टेस्टच केल्या जात नाहीत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा जाब विचारल्यावर लक्षण नसलेल्या लोकांच्या टेस्ट करत नाहीत, या ICMRच्या मार्गदर्शक सूचनेचा दाखल यंत्रणेकडून दिला जातो. त्यामुळे आता आम्ही थेट ICMR शी बोलणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

आनंदाची बातमी: धारावीतील कोरोना रुग्णसंख्येत घट, नऊ दिवसांत एकही मृत्यू नाही

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवीण दरेकर यांनी रविवारी औरंगाबादेत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारला मोठी मदत केली आहे. त्यामुळे केंद्राच्या नावाने ओरड करणे योग्य नाही. उलट राज्यातील आरोग्य यंत्रणेकडून हेळसांड झाल्याने मुंबईत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी काहींना वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही तर काहींना रुग्णालयात बेडच उपलब्ध नव्हते. या सगळ्यामुळे लोकांचे जीव जात आहेत. धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही  आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर असल्याचे दरेकर यांनी म्हटले. 

देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट

यावेळी दरेकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यासंदर्भातही भाष्य केले. भाजपचा विश्वासघात झाला, हे नड्डा यांचे वक्तव्य खरे आहे. दोन पक्ष एकत्र लढतात आणि नंतर काय झालं हे सगळ्यांनी बघितले आहे. मात्र, कोरोनाचे संकट गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल का, याविषयी अधिक बोलण्यास दरेकर यांनी नकार दिला.