आताची मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

पालघरला जात असताना डॉ. दीपक सावंत यांच्या कारला डंपरने धडक दिली, या अपघातात डॉ. दीपक सावंत यांना दुखापत झाली आहे

Updated: Jan 20, 2023, 02:09 PM IST
आताची मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल title=

Car Accident : आताची मोठी बातमी समोर येत आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak SawantP यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाला आहे. डंपरनं दीपक सावंत यांच्या कारला धडक दिली. डॉ. दीपक सावंत आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातात सावंत यांच्या मानेला आणि पाठिला दुखापत झाली असून त्यांच्या कारचंही मोठं नुकसान झालं आहे. डॉ. सावंत यांना अॅब्युलन्सने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार डॉ. दीपक सावंत हे आज सकाळी पालघर इथल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी निघाले होते. पालघरच्या दिशेने जाताना पश्चिम महामार्गावर काशिमीराजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपने सावंत यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. यात त्यांच्या मानेला आणि पाठिला दुखापती झाली आहे. 

राजकीय नेत्यांच्या कारला अपघात
गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या कारला अपघात होण्याची मालिकाच सुरु आहे. आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam), जयकुमार गोरे (Jaykumar Gore), आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे कार अपघातात (Car Accident) जखमी झालेत. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला.  परळी इथं धनंजय मुंडे यांच्या कारला तर अमरावती इथं बच्चू कडू यांना एका दुचाकीने ठोकर दिली. जयकुमार गोरे या आमदारांच्या कारचा अपघात झाला होता. यात अपघातात ते थोडक्यात बचावले होते. मागील वर्षी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालं होते.  

विश्वजीत जगताप यांचा अपघातात मृत्यू
सहा दिवसांपूर्वीच माजलगाव इथले भाजप नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. विश्वजीत जगताप हे जलगाव इथल्या छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवन जगताप यांचे चिरंजीव. गेवराईजवळ त्यांच्या कारला अपघात झाला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कारला कंटेनरने मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा अक्षरश: चेंदामेंद झाला. विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.