Crime News : दोन वर्षांपूर्वी परीक्षेसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर अचानक गायब झालेल्या सदिच्छा साने (Sadichha Sane) या तरुणीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पालघर येथून परीक्षा देण्यासाठी सदिच्छा मुंबईत आली होती. मात्र ती परीक्षेसाठी पोहोचलीच नाही. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तपास करत सदिच्छाचे अपहरण (kidnap) केल्याप्रकरणी एका 32 वर्षीय लाईफगार्डला अटक केली होती. 22 वर्षीय सदिच्छा साने ही आरोपी मिथू सिंगसोबत शेवटची दिसली होती. तेव्हापासून सदिच्छाचा शोध लागलेला नव्हता. मात्र आता आरोपीने दिलेल्या माहितीनंतर एकच खळबळ उडाली आहे.
परीक्षेसाठी निघाली पण पोहोचलीच नाही...
मुंबईच्या जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज मध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जातेय सांगून घराबाहेर पडली होती. यावेळी सकाळी 9.58 वाजता ती विरार स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली. त्यानंतर ती दुसऱ्या ट्रेनमध्ये बसली आणि वांद्रे येथे उतरली. त्यानंतर तिने वांद्रे बँडस्टँडला जाण्यासाठी रिक्षा घेतली. मोबाईल फोनच्या लोकेशनवरून ती दुपारपर्यंत त्याच परिसरात फिरत असल्याचे उघड झाले होते.
मोबाईलमधील सेल्फीमुळे संशय बळावला
यानंतर सुरुवातीला नागपाडा पोलिसांनी मिथु सिंगकडे चौकशी केली होती. पोलिसांना संशय आल्याने त्याची सखोल चौकशी केली. यावेळी आरोपी सिंग याच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचण्या केल्या होत्या पण त्यात काहीही सापडले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुन्हा मिथू सिंगला ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली. त्यावेळी "माझी ड्युटी वांद्रे बॅंडस्टँडवर असताना सदिच्छा मला तिथे दिसली होती. सदिच्छाला एकटी पाहून ती आत्महत्या करण्यासाठी आली असे मला वाटले. त्यानंतर मी तिच्याकडे गेलो तेव्हा तेव्हा सदिच्छाने मी जीव द्यायला आलेली नाही असे सांगितले. यानंतर आम्ही दोघेही एका खडकावर बसलो आणि बोलू लागलो. त्यानंतर मी सदिच्छासोबच चार सेल्फी काढले," अशी माहिती मिथू सिंगने दिली होती.
पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मिथू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली होती. चौकशीत सदिच्छा हिची हत्या केल्याचे मिथू याने कबूल केले आहे. तसेच तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचेही मिथून सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला मिथूवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता या प्रकरणी त्याच्यावर भादंवि कलम 302 अंतर्गत हत्येचे कलम लावण्यात आले आहे.
आरोपी मिथू आणि त्याचा साथीदार अब्दुल यांच्यामध्ये मोबाइलवरून सांभाषण झाले होते. यामध्ये दोघेही सदिच्छाबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील बोलत होते असे तपासातून स्पष्ट झाले. बँडस्टँड येथे सदिच्छाला भेटल्यानंतर काही वेळाने मिथू लाइफ रिंग घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. सदिच्छाची भेट घेतल्यानंतर मिथू घरी आला होता आणि त्याने तिला इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवल्याचे पोलीस तपासात उघड झाले.