महाराष्ट्र, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक

महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येते आहे. 

Updated: Apr 16, 2020, 10:31 AM IST
महाराष्ट्र, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक title=

मुंबई : महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २३२ नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र गेल्या चार दिवसांची आकडेवारी पाहता ही आकडे सर्वात कमी आहे. तर दिल्लीतही केवळ १७ नवे रूग्ण आढळलेआहेत.  दिल्लीची ही २४ तासांतली सर्वात कमी आकडेवारी आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातल्या लढ्याला, सरकारच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

जरी राज्यात आणि दिल्लीत कोरोना बाधित रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागत असला तरी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम पाळणे तितकेच गरजेचे आहे. नागरिकांनो घरात बसा, लॉकडाऊन पाळा, कोरोनाचा प्रसार होईल असं काहीही करू नका. आपल्याला कोरोनाविरोधातलं हे युद्ध जिंकायचं आहे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे आणि पुणे हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरलेत. इथल्या रुग्णांचा वाढता आलेख खाली आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  आता 'कोरोनाचा वाढता आलेख खाली आणायचाय', मृत्यू होऊ न देणं हेच यापुढचं मोठं आव्हान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जगात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. जगात २० लाख १५ हजार ५७१ जणांना कोरोनाची लागण झालीय. जगात कोरोनाने तब्बल १ लाख ३१ हजार जणांचा बळी घेतलाय. अमेरिका आणि युरोपात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. 

अमेरिकेत २८,३२६ मृत्यू झालेत. तर युरोपात तब्बल ८८,७१६ मृत्यू झालेत. तर देशात कोरोनाचे एकूण १२,३८९ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत देशात ४१४ जणांचा बळी गेलाय. तर १४८९ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. राज्यात कोरोनाचे २९१६ रूग्ण आढळले आहेत. तर १८७ जणांचा बळी गेलाय. राज्यात गेल्या २४ तासांत २३२ रुग्ण वाढलेत. मुंबईत १४० नवे रुग्ण आढळले आहेत.