ठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार?

19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर मंत्र्यांनाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 5, 2023, 01:55 PM IST
ठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार? title=

Maharashtra Politics : शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) शक्यता वर्तवण्यात येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी काल रात्री तातडीचा नवी दिल्ली दौरा करत अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या मंत्रिमंडळात मिशन 45 ला फायदेशीर ठरणाऱ्या नेत्यांनाच स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापण दिन असून त्याआधी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार व्हावा असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडल्याची माहिती आहे. 

पुढच्या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) समोर ठेवून या मंत्रीमंडळात नेत्यांची वर्णी लावली जाणार आहे. प्रभाव पाडू न शकणाऱ्या आणि वादग्रस्त नेत्यांना बाजूला केलं जाणार असल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे महिला आमदारांनाही स्थान मिळण्याचीही शक्यता आहे. पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराची मंत्रीमंडळात वर्णी लागली नव्हती.त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दोन खासदारांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. 

सर्व निवडणुकू एकत्र लढवणार
आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. शिंदे फडणवीसांची बैठक अमित शाहांसोबत झाली. आगामी लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढवणार असल्याचा निर्णय शाहांसोबतच्या दिल्लीतील बैठकीत झाला. या बैठकीबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करून दिलीय.

संजय राऊत यांची टीका
दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीचं मांडलिकत्व पत्करलंय अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीत कशाला मुख्यमंत्री गेले असा सवाल त्यांनी केला. 

काँग्रेसचं सावध पाऊल
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी घाई नको असा सूर काँग्रेसमध्ये उमटतोय. जागावाटप लवकरात लवकर करण्याची मागणी राष्ट्रवादीतून होत आहे. त्यावर काँग्रेस मात्र अजूनही धिरे चलोच्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय. जागावाटपाचा एवढ्या लवकर प्रश्नच येत नाही असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटलंय. 

'तर कानाखाली आवाज काढेन'
तिकीटासाठी भांडलात तर कानाखाली आवाज काढेन असा दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात महत्त्वाची बैठक आहे. लोकसभा आणि मनपा निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना हा दम दिला.