मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव वर्क फ्रॉन होम करत आहेत. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी माहिती काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री अनुपस्थित होते.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी जोरदार टीका केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठिक नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा कोणाला तरी पदभार द्या, 'मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंना शपथ घ्यावी लागेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय.
मुख्यमंत्री गेल्या ४५ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुसऱ्याकडे चार्ज द्यायला हवा अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहावं. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यायला हवी. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
किशोरी पेडणेकर यांचं उत्तर
चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. रश्मी ठाकरे राजकारणात नसताना त्यांचं नाव मधे का घेतलं जात आहे, सतत प्रकाशझोतात असणाऱ्या अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा असा खोचक सल्ला किशोरी पेडणेकर यांनी दिला.
चंद्रकात दादांची किव येते, ते मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. भाजप नेते सातत्याने स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. ही हिंदू धर्माची शिकवण नाही, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. भाजपचे नेते अशी टीका करणार असतील तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.