शरद पवारांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची दोरी, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?

राज्याच्या राजकारणात दररोजच धक्कादायक गौप्यस्फोट होताना दिसतायत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीनेही राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.. त्याची चर्चा संपत नाही तोवरच मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय

Updated: Aug 16, 2023, 07:36 PM IST
शरद पवारांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची दोरी,  राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार? title=

Maharashtra Politics : राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरुन सध्याचं राजकारण ढवळून निघालंय. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद (CM Eknath Shinde) जाणार आणि ती खुर्ची अजित पवारांना मिळणार अशीच जोरदार चर्चा सध्य़ा राजकारणात सुरु आहे. मात्र या चर्चेत आता नवा ट्विस्ट आलाय. शरद पवारांना (Sharad Pawar) सोबत आणल्याशिवाय अजित पवारांच्या (Ajit Pawar) गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार नसल्याचा गौप्यस्फोट दुसरा तिसरा कुणी नव्हे तर मविआतली घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे (Congress) नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीच केलाय.  आणि त्यामुळेच अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय. 

मात्र वडेट्टीवारांचा हा दावा मविआतीलच दुसरा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटानं  (Thackeray Group) फेटाळून लावलाय.  मुंबईतही अजित पवार गटाने दोनदा शरद पवारांशी भेट घेतली होती. तेव्हाही शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या वावड्या उठल्या. मात्र राष्ट्रवादीबाबत संभ्रम निर्माण होण्यासाठीच अशा गोष्टी पेरल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. मात्र या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गट मात्र चिंतेत सापडलाय.. जर पवारांनीच साथ सोडली तर ठाकरे गटाचं काय होणार असा सवाल विचारला जातोय.. 

दुसरीकडे शरद पवारांना केंद्रात कृषिमंत्रीपद आणि निती आयोगाचं अध्यक्षपद देऊ केल्याचा दावा माजी मुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनाही मंत्रिपदाची ऑफर असल्याचाही दावा करण्यात आलाय. अजित पवार म्हणूनच वारंवार शरद पवारांकडे भाजपसोबत चला म्हणून याचना करत असल्याचं बोललं जातंय.. तेव्हा अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची दोरी सध्या तरी शरद पवारांच्याच हातात असल्याचं दिसतंय....मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगतायत,. 

शरद पवारांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं जरी स्पष्ट केलं असलं तरी त्यांनी जाहीर केलेली भूमिका बदलल्याचं अनेकदा राज्याच्या राजकारणात दिसून आलंय.. त्यामुळेच ठाकरे गट आणि काँग्रेसनेही पवार सोबत आले नाहीत तर राष्ट्रवादीशिवाय लढण्याचा इरादा बोलून दाखवलाय.. तेव्हा राज्याच्या राजकारणात पुन्हा लवकरच महाभूकंप होणार का याचीच चर्चा सुरु आहे. 

राष्ट्रवादीची भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात असल्यानं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं प्लान बी आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे... राष्ट्रवादी सोबत आली नाही तरी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र राहणार असल्याचं समजतंय. याबाबत थेट पवारांकडेच विचारणा केली असता, या सगळ्या चर्चा आहेत, वस्तुस्थिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक स्वरूपाची होती, असा दावाही पवारांनी केला. दरम्यान, कौटुंबिक नातं आणि राजकारण यात कसा फरक असतो, हा मुद्दा पटवण्यासाठी सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि दिवंगत शेकाप नेते एन. डी. पाटील यांच्या नात्याचं उदाहरण दिलं.

येत्या ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या बैठकीत पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडं आता मविआचं लक्ष लागलंय.. मात्र पवार काका-पुतण्यांनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलंय, एवढं नक्की.