BREAKING : एसटी संपाबाबत तोडगा नाहीच, आंदोलकांविरुद्ध सरकारने घेतला 'हा' कठोर निर्णय

आवाहन करुनही संप मागे घेत नसल्याने संपकरी कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर निर्णय घेतला आहे

Updated: Nov 10, 2021, 06:41 PM IST
BREAKING : एसटी संपाबाबत तोडगा नाहीच, आंदोलकांविरुद्ध सरकारने घेतला 'हा' कठोर निर्णय title=

दीपक भातूसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक पार पडली. पण या बैठकीत एसटी संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही.

एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याबाबत आवाहन केलं होतं. पण यानंतरही संप सुरुच असून संप आणखी चिघळत चालला आहे. 

त्यामुळे आता एसटी महामंडळ कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई  करण्याची भूमिका एसटी महामंडळाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाकडून काल 376 आणि आज 542 अशी आतापर्यंत 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले नाहीत, तर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कदाचित उद्यापासूनच कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळ घेऊ शकतं.