तीन दिवसांनी लसीकरण ठप्प होईल, केंद्राकडून पुरवठा कमी प्रमाणात- आरोग्यमंत्री

या परिस्थिती कुणीच राजकारण करू नये असे आवाहन 

Updated: Apr 7, 2021, 12:48 PM IST
तीन दिवसांनी लसीकरण ठप्प होईल, केंद्राकडून पुरवठा कमी प्रमाणात- आरोग्यमंत्री title=

मुंबई : 14 लाख लसी उपलब्ध आहेत. हा तीन दिवसांचा स्टॉक आहे. तीन दिवसांनी लसीकरण (Vaccination) ठप्प होईल. दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा केला पाहिजे.केंद्र लस पाठवतात पण गती कमी आहे. जसं सांगितलं जातंय तसा पुरवठा होत नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले. 

अनेक ठिकाणी लस नाही, अनेक जिल्ह्यात लस नाही म्हणून केंद्र बंद करावी लागत आहेत. या परिस्थिती कुणीच राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

केंद्राच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या आहेत. केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा आहेत.आम्ही ३ लाख दररोज लसीकरण करत होतं ते ६ लाख करा असं सांगितलं. आज आम्ही ४.५ लाखापर्यंत पोहचलो पण लस नाही म्हणून आम्हाला काही लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. लस नाही म्हणून  अनेक केंद्रावरून लोकांना आम्ही परत पाठवत आहोत. लसीचा पुरवठा करा असं आम्ही केंद्राकडे वारंवार सांगतोय असे ते म्हणाले. 

काल देशाचे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याबरोबर देशातील ९ राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची व्हीसी झाली. केंद्र सरकारच्या नियमावलींचे तंतोतंत पालन करणारे महाराष्ट्र हे अग्रभागी असल्याचे आम्ही त्यांना सांगितलं.अनेक व्यापाऱ्यांचा विरोध पत्करून आम्ही कोरोना रोखण्यासाठी जे जे करायचं ते केलंय असे टोपे म्हणाले. 
 
आम्ही लसीकरणासाठी गावा गावात टीम पाठवतोय.तशी यंत्रणा आम्ही उभी केलीय पण आम्हाला लस मिळत नाही. काल मी कळकळीची विनंती केली आम्हाला लस लवकर द्या. सर्वात जास्त फिरणारा वर्ग २० ते ४० वयोगटातील
हे लोक जास्त कोरोनाग्रस्त झाल्याचं दिसतंय. त्यामुळे १८ च्या पुढे सर्वांचे लसीकरण करायची मागणी केलीय. इतर राज्यात नंतर करा पण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतायत त्यामुळे इथे आधी द्या अशी मागणी आम्ही केली. 

1200 मेट्रीक टन ऑक्सीजन तयार होतो. 700 मेट्रीक टन लागतो. त्यामुळे ऑक्सीजनची मागणी वाढत चाललीय. आजूबाजूच्या राज्यातून ऑक्सीजनचा पुरवठा करा अशी मागणी केलीय. 

५० हजार रेमडेसेवीर दिवसाला मिळतायत पण त्या सर्वांचा वापर होतोय. रेमडेसेवीरच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकारने मदत करायला हवी. सर्व खाजगी डॉक्टरांनी रेमडेसेवीरचा वापर हा टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमानुसार द्या. गरज नसताना रेमडेसेवीर दिले जातेय असं लक्षात आलंय असेही ते म्हणाले. 
 
डॉक्टरांनी आपलं बिल वाढवण्याकरिता असं करू नका.रेमडिसिव्हरचा भाव ३ ते ४ हजार केला जातो. ते ११०० ते १४०० च्या वर विकू नये असं आपण ठरवलं
पण त्याचं पालन केलं जात नसल्याचं दिसून आलं. यासाठी आम्ही एक समिती नेमली आहे ती रेमडेसेवीरची किंमत ठरवेल.त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. 

होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण अचानक गंभीर होत आहेत. काही नवीन स्ट्रेन आलाय का ? याची तपासणी करण्यासाठी आम्ही केंद्रीय संस्थेला सॅम्पल पाठवले आहेत. त्याबाबत लवकर कळवा असं सांगितलं आहे. NHM ने शहरातील आरोग्य सेवेसाठी कर्मचारी पुरवावे अशी मागणी देखील करण्यात आलीय.

व्हेंटीलेटर दिलेयत पण ट्रिबिटॉन नावाच्या कंपनीचं व्हेंटीलेटर वापरता येत नाही, त्याचं लवकर प्रशिक्षण द्या अशी विनंती केली आहे. बेड उपलब्ध नाहीत अशा तक्रारी येतायत, बेड वाढवण्याचा निर्णय घेतलाय. गरजेप्रमाणे बेड वाढवण्याची व्यवस्था केली जातेय असेही आरोग्यमंत्री म्हणाले. 

काही ठिकाणी दुकानं बंद केल्याचा रोष होतोय पण आपल्याला जीव वाचवायचे आहेत. निर्बंधात शिथिलता हवी असेल तर नियम काटेकोर पाळले पाहिजेत. थोडी कळ सोसायला हवी असेही ते म्हणाले.