Sharad Pawar Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे. शरद पवारांनी राजकीय भवितव्यासंदर्भात केलेल्या एका मोठ्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात भविष्यात मोठा भुकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलिन होऊ शकतो अशा चर्चा पवारांच्या या विधानामुळे जोर धरु लागल्या आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर उधाण आलं आहे. शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये एक सूचक विधान केलं आहे. "भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. काँग्रेस आणि आमच्या पक्षात वैचारिक मतभेद नाहीत, असं पवार यांनी म्हटलं आहे. "काँग्रेस आणि आम्ही नेहरु-गांधींच्या विचारसरणीचे आहोत," असंही शरद पवारांनी या मुलाखतीत आवर्जून म्हटलं आहे. त्यामुळेच आता भविष्यात शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार की काय यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील किंवा काँग्रेसचं नेतृत्व मान्य करतील किंवा काँग्रेसमध्ये विलीनही होऊ शकतात, असं शरद पवार मुलाखतीत म्हणाले. हा नियम तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही लागू होतो का? असं पवारांना विचारण्यात आलं असता त्यांनी थेट उत्तर टाळलं. मात्र आमचे आणि काँग्रेस पक्षाचे कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत. गांधी-नेहरुंची विचारसरणी हीच आमची आणि काँग्रेसची विचारणी आहे. जो निर्णय घ्यायचा आहे तो सहकाऱ्यांशी चर्चा करुन घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. म्हणजेच त्यांनी विलीनिकरणाची शक्यता नाकारलीही नाही आणि थेट उत्तरही दिलं नाही.
शरद पवार गटाच्या नेत्या वंदना चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, "काँग्रेसने खऱ्या अर्थाने पक्षाची चांगली उभारणी केली आहे. अनेक तक्रारी मध्यंतरी त्यांच्यासंदर्भात आल्या होत्या. ते हवा तसा विरोध भाजपाला करत नाही असं म्हटलं होतं. मात्र प्रादेशिक पक्ष लढत होते. पण मागील 2 वर्षात काँग्रेसपक्षाने पुढाकार घेऊन लढण्याचं ठरवलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ते दिसत आहे. पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही यंदा लोकसभेच्या निमित्ताने लढा उभा केला आहे. इंडिया फ्रंट म्हणून जी आघाडी उभी राहिली. त्या माध्यमातून भाजाला एक पर्याय द्यायचा असेल तर त्या विचाराने पवारांच्या मनात आपण एकत्र येण्याचा विचार आला असेल. मात्र यासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा झालेली नाही," असं सांगितलं. सध्याचं चित्र पाहता एकत्र जाणं गरजेचं आहे, असंही वंदना चव्हाण यांनी म्हटलं. मध्यंतरी प्रसारमाध्यमांमध्ये शक्यता म्हणून चर्चा झाली. मात्र तेव्हाही पक्षांतर्गत चर्चा झालेली नाही. अशी चर्चा केवळ कार्यकर्त्यांमध्ये होती. नेत्यांमध्ये ही चर्चा झालेली नाही, असंही चव्हाण म्हणाल्या.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली. "काँग्रेस हा लोशाहीवादी पक्ष आहे. 2004 मध्ये काँग्रसने प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन उत्तम सरकार दिलं होतं. तो राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या देशाचा सुवर्णकाळ होता. कधीही प्रादेशिक पक्षाची अवहेलना दिली नाही. काँग्रेसने कायमच प्रादेशिक पक्षांना स्पेस दिला आहे. त्यामुळे त्यांचा काँग्रेसवरील विश्वास वाढतोय. अनेक पक्ष काँग्रेसमधूनच तयार झाले आहेत बाहेर पडून त्यांनी त्यांची जागा तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची विचारसरणी काँग्रेसचीच असल्याचं दिसत असल्याने भविष्यात छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात," असं लोंढे म्हणाले. "लोकशाही पद्धतीने काम करणारे राहुल गांधीही अनेकांना भावले असून ते सर्वांचं ऐकून घेतात, सर्वांना त्यांची स्पेस मिळवण्याची संधी देतात. हा फार मोठा फॅक्टर आहे," असंही लोंढे म्हणाले.