Loksabha Election 2024 Seat Sharing: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. मंगळवारी रात्री 10 वाजता अमित शाह मुंबईत दाखल झाल्यानंतर 'सह्याद्री' अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर त्यांनी सविस्तर बैठक घेतली. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेल असं मानलं जात आहे. या बैठकीमध्ये अमित शाहांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जागावाटपाचा तिढा सोडवताना भाजपा जागांवर अडून राहणार नाही अशी चिन्हं दिसत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील सभा संपल्यानंतर शाह मुंबईत दाखल झाले. त्यापूर्वी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये जागावाटपावरुन प्राथमिक चर्चा झाली. शिवसेनेला 20 ते 22 जागांची अपेक्षा आहे. तरक अजित पवार गटाला किमान 10 जागा हव्या आहेत. विद्यमान खासदार असलेल्या जागा त्याच पक्षाकडून लढवल्या जातील असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे. मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसकडे असलेल्या जागांवर कोण उमेदवार देणार यावरुन मतभेद असल्याचं समजतं. मात्र याच मतभेदावर 'सह्याद्री' अतिथीगृहातील चर्चेदरम्यान तोडगा निघाल्याचं सांगितलं जात आहे. जागावाटपाचा तिढा कायम असल्यानेच भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता असं बोललं जात आहे.
400 प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा, असे आदेश अमित शाहांनी तिन्ही प्रमुख मंत्र्यांना दिले आहेत. तसेच, जागावाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपले मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा, असंही अमित शाहांनी सांगितलं आहे. यावरुनच भाजपा जागावाटपामध्ये अन्य 2 सहकारी पक्षांना झुकतं माप देण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आश्वासन देताना, जागावाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही, असंही म्हटलं आहे. उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षाची असेल, असंही अमित शाहांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं. त्याचप्रमाणे महायुतीमधील काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून ते सोडवा, असे निर्देशही शाह यांनी दिले.
अमित शाहांबरोबरच्या या बैठकीनंतर राज्यातील नेत्यांमध्ये असलेला जागावाटपाचा तिढा सुटल्यास गुरुवारी होणाऱ्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं असा अंदाज आहे. मात्र शिंदे आणि पवार गटाला देण्यात आलेल्या जागांवर उमेदवार कोण द्यायचा यासंदर्भात भाजपाकडून सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार ठरवतानाही भाजपाच्या शब्दाला अधिक वजन रहावं अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा असल्याचं स्पष्ट होत आहे.