Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नव्या प्रचार गीतातील 2 शब्दांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित असलेले हे दोन शब्द कोणत्याही परिस्थितीत काढले जाणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले. हे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रचाराताली व्हिडीओ दाखवले. आमच्यावर कारवाई करण्याआधी त्यांच्यावर कारवाई करा, असे त्यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटले.
अटलजी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क 6 वर्षासाठी काढून घेतला होता. हिंदू धर्माचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारातील भाषणात 'बजरंग बली की जय बोलून बटण दाबा' असं सांगतायत. अमित शाह 'बजरंग बलीचं दर्शन देतो' असे म्हणतात. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
आमचं पुर्वीचं गीत जनता उत्साहाने गाते. आम्ही मशाल चिन्ह मिळाल्यानंतर प्रेरणा गीत आणलं. त्यातील हिंदु हा तुझा धर्म, जाणून घे मर्म..यातील हिंदू हा शब्द निवडणूक आयोगाने काढायला लावला आहे. आम्ही हिंदु धर्माच्या आधारे मत मागितलं नाही. चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायला हवे. या गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जय भवानी, जय शिवाजी घोषणा आहे. यातील जय भवानी हा शब्द काढावा असे आयोगाने म्हटले आहे. तसेच हिंदु हा तुझा धर्म या शब्दावरही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय.
सर्वात आधी मोदी-शहांवर कारवाई करा. महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल द्वेश जनता खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढला जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटण दाबा असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही रामलल्लाचे दर्शन देतो, असे अमित शाह म्हणाले. गेली कित्येक वर्षे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. तुळजाभवानी हे आपलं कुलदैवत आहे. त्यामुळे आम्ही हे शब्द गीतातून वगळणार नाही, असे ते म्हणाले.