Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: लोकसभेच्या निकालामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळवलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता मिळवण्यात अपयश आलं असून मित्रपक्षांची मदत घेऊनच त्यांना सत्ता स्थापन करावी लागणार आहे. असं असतानाच आता या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी इंडिया आघाडीला मिळालेल्या जागांचा उल्लेख करत आमच्याकडेही आकडे आहेत, असं म्हटलं आहे. तसेच मोदींचीच सत्ता येणार असं काही निश्चित नसल्याचे संकेत देणारी विधान राऊत यांनी केली आहेत. त्याप्रमाणे मोदींचं सरकार येणार म्हणणाऱ्यांना आता एनडीएचं सरकार आणण्यासाठी झगडावं लागत असल्याचा टोला राऊतांनी लागवला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना भाजपा सत्ता स्थापन करणार असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी, "भाजपाला बहुतम मिळालेलं नाही. भाजपाला 240 का काय जागा मिळाल्यात. कालपासून मी पाहतोय एनडीएचं सरकार, एनडीएचं सरकार. मोदींचं सरकार आणणार होते ना. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोन बांबूंच्या आधारावर जे सरकार बनणार आहे ते कधीही हलू शकतं," असं विश्लेषण केलं आहे.
नक्की पाहा >> 'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट
"मोदींचं नाक कापलं आहे. आम्हाला नाक कापलेला पंतप्रधान नकोय. मोदी ब्रॅण्ड संपला आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे तर बहुमत आणलं आहे. हा ईडी, सीबीआयचा आकडा आहे. भाजपाचा हा आकडा नाही. भाजपा हारलीय. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सने त्यांना मिळवून दिलेला आकडा आहे. ते सरकार स्थापन करणार असतील तर ही लोकशाही आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत करतो. आम्ही लोकशाही मानतो. सरकार बनवण्याची तयारी करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आकडे तर आमच्याकडेही आहेत. आम्हीसुद्धा आता 250 पर्यंत आहोत. आम्हाला 100 जागाही द्यायला तयार नव्हते," असं राऊत म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> 'मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य..', ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले, '400 पारचा नारा..'
"आम्हाला मिळालेली मतं ही लोकांनी दिलेला कौल आहे. जर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी ठरवलं की आम्हाला हुकूमशाहाबरोबर नाही जायचं आहे. आम्हाला लोकशाही रचनेमध्ये काम करायचं आहे असं म्हटलं तर? दोघांनी हुकूमशाहीविरोधात संघर्ष केलं आहे, मग ते चंद्राबाबू असो किंवा नितीश कुमार असो. मला नाही वाटत ते दोघे हुकूमशाहाबरोबर जातील," असं विधान राऊत यांनी केलं आहे.