कोरोनावर मात करुन आरोग्याची गुढी उभारुया - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Updated: Apr 13, 2021, 07:21 AM IST
कोरोनावर मात करुन आरोग्याची गुढी उभारुया - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे title=

मुंबई : कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Uddhav Thackeray greets people on Gudhi Padwa Appeals, people to celebrate a simple Gudhi Padwa this year)

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारीका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबूया.  नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजुला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करुया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

संतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला गुढी पाडव्याचा सण सर्वांनी आनंदात, उत्साहात, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारतीय आणि मराठी संस्कृतीत गुढी पाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुचं आगमन होतं. झाडांची सुकी पानं गळून पडतात. नवीन पालवी फुटते. निसर्गातील या आशादायी बदलांचं उत्साहानं स्वागत करण्याचा हा सण आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा सामुहिकपणे साजरा करता येत नसला तरी, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन यंदा गुढीपाडवा साधेपणानं साजरा करुया. कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा सर्वांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपाल  कोश्यारी यांच्याकडून शुभेच्छा  

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरिता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो.  युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल  कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.