खंडाळ्यात कुर्ला-मदुराई एक्स्प्रेसला विचित्र अपघात

एक्स्प्रेसला विचित्र अपघात

Updated: Jul 6, 2018, 09:10 AM IST
खंडाळ्यात कुर्ला-मदुराई एक्स्प्रेसला विचित्र अपघात title=

खंडाळा : खंडाळ्यात कुर्ला-मदुराई एक्स्प्रेसला झालेल्या विचित्र अपघातानं आज सकाळी पुण्याकडे जाणाऱ्या मध्यरेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. सुदैवानं अपघातानंतर गाडीतले सर्व प्रवासी सुखरुप आहे. पहाटे २ वाजून ४० मिनिटांनी घाट चढण्यासाठी एक्सप्रेसच्या मागच्या बाजूला लावण्यात आलेलं इंजिन सामान्याच्या डब्यात घुसल्यानं त्या डब्याचा चेंदामेंदा झाला.

अपघातग्रस्त भोगी आणि त्यापुढील अजून एक भोगी घटनास्थळी ठेऊन मदुराई एक्सप्रेसला पुढे काढण्यात आले आहे. आणि सध्या अपघातग्रस्त भोगी तसेच बंकर इंजिन बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घाटात डाऊन लाईन, अप लाईन आणि मिडल लाईन आशा एकूण तीन रेल्वे लाईन असल्याने डाऊन लाईन बंद करून मिडल लाईनने रेल्वेची वाहतूक सुरू ठेवल्याने रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही स्वरूपाचा अधिक परिणाम झाला नाही. 

कुर्ला-मदुराईच्या दिशेने जाणारी डाऊन ११०४३ मदुराई एक्सप्रेस या गाडीला खंडाळा रेल्वे स्थानकाच्या जवळ डाऊन लाईनवर अपघात झाला. मात्र सुदैवाने मागच्या भोगीमध्ये लगेज ठेवण्याची जागा असल्याने प्रवाशांपर्यंत हा धक्का पोचला नाही. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी देखील झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा पोलीस, रेल्वेचे कर्मचारी, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.