कोविड वॉर्डमधील परिस्थिती आणखी गंभीर, तरीही केईएम रुग्णालय प्रशासन निष्ठुर

कोरोना व्हायरसचा मुंबईतील वाढता प्रादुर्भाव पाहता....

Updated: Jun 2, 2020, 12:34 PM IST
कोविड वॉर्डमधील परिस्थिती आणखी गंभीर, तरीही केईएम रुग्णालय प्रशासन निष्ठुर title=
संग्रहित छायाचित्र

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: कोरोना व्हायरसचा मुंबईतील वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचा ताण हा थेट शहरातील रुग्णालयांवर येत  आहे. त्यातही शासन आणि पालिकेशी संलग्न  रुग्णालयांमध्ये ही तणावपूर्ण परिस्थिती हाताळताना सावळा गोंधळ दिसून येत आहे. परिणामी पुन्हा एकदा आरोग्याबाबतचे प्रश्न उभे राहत आहेत. मुंबईतील केईएम रूग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये असंच चिंताजनक चित्र पाहायला मिळत असून, परिस्थितीती आणखी गंभीर होत असल्याची स्पष्टोक्ती देत आहे. 

एकिकडे मृतदेहांशेजारी कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं धक्कादायक चित्र केईएम रुग्णालयात पाहायला मिळालं होतं. त्यामागोमाग  रुग्णालयातील कोविडसाठीच्या अतिदक्षता विभागातील नर्स आणि वॉर्डबॉय तासनतास जागेवर नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागाने पुन्हा एकदा प्रशासनाचं लक्ष वेधलं. 

केईएममध्ये सध्या रात्री ८ ते १२ अशा चार तासांच्या काळात रूग्णांच्या सेवेसाठी कुणीच वॉर्डमध्ये नसल्यामुळं त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वारंवार माध्यमांमध्ये या परिस्थितीचं कथन करुनही रूग्णालय प्रशासन काही केल्या सुधरेना, त्यामुळं रुग्णांना मरणाच्या दारात सोडण्याचंच काम प्रशासनाकडून होतंय का, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. 

केईएममध्ये असणारी एकंदर परिस्थिती पाहता योग्य नियोजन नसल्यामुळं गेल्या कित्येक दिवसांपासून कोविड रूग्णांच्या वॉर्डमध्ये कर्मचा-यांची वानवा आहे. ३५ रूग्णांच्या आयसीयू वॉर्डमध्ये तीन निवासी डॉक्टरांव्यतिरिक्त एकही नर्स, वॉर्डबॉय नसल्याचा सलग दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. 

रूग्णांना तपासणीचं काम सोडून डॉक्टरांना नर्स आणि वॉर्डबॉयचीही कामं करावी लागत आहेत. इतकंच नव्हे तर, रूग्णांना शौचालयांपर्यंत नेण्यासाठीसुद्धा कोणाची मदत होत नाही आहे. शिवाय त्यांना खाणंपिणं, औषधं देण्यासाठीही कुणी नसल्याची विदारक चित्र आहे. 

 

इतका निष्काळजीपणा का? 

मृत्यूच्या दारात असलेल्या गंभीर रूग्णांच्या वॉर्डमध्ये इतका निष्काळजीपणा नेमका का आणि कसा खपवून घेतला जातो, केईएमच्या निष्ठूर प्रशासनाला कधी जाग येणार हेच प्रश्न वारंवार डोकं वर काढत आहेत. मुख्य म्हणजे देशातील काही नामांकित रुग्णालयांमध्ये गणल्या जाणाऱ्या केईएममधील ही वाईट अवस्था पाहता आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे.